बिबट्याच्या भीतीपेक्षा मुलांची चिंता अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:06+5:302021-06-03T04:07:06+5:30
नागपूर : कधी नव्हे, तो या परिसरात बिबट्या आला, तो अजूनही सापडला नाही, याची भीती आम्हाला आहेच, पण त्यापेक्षाही ...
नागपूर : कधी नव्हे, तो या परिसरात बिबट्या आला, तो अजूनही सापडला नाही, याची भीती आम्हाला आहेच, पण त्यापेक्षाही अधिक काळजी अंगणात आणि परिसरात खेळणाऱ्या आमच्या लहान मुलांची आहे, अशा शब्दांत चिंता व्यक्त केली सुरेश कोहळे यांनी!
अंबाझरी, एनआयटी ते आता महाराज बाग परिसर असा प्रवास करीत असलेला बिबट्या अद्यापही वनविभागाला सापडलेला नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भीती आणि चिंता व्यापली आहे. सहा दिवसांपासून शहरात शिरलेला बिबट्या आता चक्क शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचला आहे. दोन दिवसांपासून तो पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात वावरत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, ही भावना व्यक्त झाली. पीकेव्ही कर्मचाऱ्यांची वसाहत अगदी नाल्यालगतच आहे. लागूनच दाट झाडी आहे. या परिसरात सायंकाळी पिंजरा लावण्यात आला.
पीकेव्हीचे कर्मचारी राजेश अंबाडे म्हणाले, ही वसाहत रात्री निर्मनुष्य असल्यासारखी होते. त्यामुळे भीती वाढली आहे. वनविभागाने या परिसरात सुरक्षा पथक ठेवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. राहुल बोरसरे हा मूर्तिकार युवक म्हणाला, सायंकाळी जेवल्यानंतर आम्ही सर्व जण मुक्तपणे फिरायचो. आता ते बंद झाले आहे. लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. नरेंद्र मेश्राम म्हणाले, वनविभागाने अद्याप आम्हाला कसल्याही सूचना दिलेल्या नाहीत. आम्हालाच काळजी घेऊन वावरावे लागणार आहे. सायंकाळनंतर क्वार्टरबाहेर अंगणार येणेही जोखमीचे झाले आहे.
या परिसराला लागूनच गवळीपुरा आहे. येथे सुमारे ७०० ते ८०० नागरिक राहतात. बहुतेकांची घरे नाल्याच्या काठावर असून, अनेकांकडे गायी व म्हशी आणि बछडे आहे. यामुळे गवळीपुऱ्यातही बिबट्याची दहशत पसरली आहे. गवळीपुरातील पंकज सिरसवार दुधाचा व्यवसाय करतात. ते म्हणाले, असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आमच्या जनावरांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने काळजी वाटते. वनविभागाने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. दीपक सिरसवार महणाले, आमची जनावरी आम्ही उघड्यावरच बांधतो. दोन दिवसांपासून रात्री आळीपाळीने जागून जनावरांवर लक्ष ठेवत आहोत. नाल्याच्या परिसरात दाट झाडी असल्याने तो दिवसाही दिसणे कठीण आहे. त्यामुळे वनविभागाने त्याला पकडण्यासाठी उपाययोजना करावी.
...
आता डुकराच्या शिकारीबद्दलच शंका!
सोमवारच्या रात्री रानडुकराची शिकार केलेली आढळली. मात्र, ही शिकार बिबट्याकडूनच झाली असावी, याबद्दल आता वनविभागातील काही अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी शंका व्यक्त करीत आहेत. शिकार केल्यावर संबंधित वाघ-बिबट पुन्हा त्या ठिकाणी येऊन शिकार सुरक्षित असल्याची खात्री करतात. मात्र, या घटनेत तसे झाले नाही. शिकार केल्यानंतर बिबट्या आपली शिकार उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवतो. तेथे तसे घडले नव्हते. शिकार करताना आधी गळा पकडला जातो. डुकराच्या गळ्यावर दाताचे व्रण आहेत, पण त्याबद्दलही पशुवैद्यकांना शंका आहे. ज्या पद्धतीने शिकार खाण्यात आली, त्यावरही अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. असे असले, तरी बिबट या परिसरात दोन दिवसांपूर्वी दिसला, हे तेवढेच सत्य आहे. वेगवेगळ्या घटनेतील त्याचे प्रत्यक्षदर्शीही आहेत. पावलांचे ठसे, भिंतीवर ओरखडे, कुत्र्यांसोबत केलेल्या झटापटीत जखमी कुत्र्यांच्या शरीरावर आढळलेले व्रण, या बाबी मात्र तेवढ्याच सत्य आहेत.
...