बालगोपाळांनी घरीच साजरा केला तान्हा पोळ्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 08:23 PM2020-08-19T20:23:11+5:302020-08-19T20:26:49+5:30
कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतीकामात उपयुक्त ठरणारा व शेतकऱ्यांच्या कृषी जीवनातील अविभाज्य भाग असलेला बैल मानवासाठी पुजनीय ठरला. म्हणून बैल पोळा मनोभावे साजरा केला जातो. त्याच मनोभावातून पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा होतो. हा खास बच्चेकंपनीचा आवडता सण. आपल्या आवडत्या नंदीला आकर्षकपणे सजवून लहान मुले मिरवत असतात. कोरोनाच्या प्रकोपामुळे यावर्षी बाहेर मिरवणुकीत सहभागी होणे अडचणीचे झाले आहे. मात्र बाळगोपालांनी घरीच नंदीला मस्त वेशभूषेत सजवून तान्हा पोळ्याचा आनंद लुटला.
नागपूरकर राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी १८०६ मध्ये ही प्रथा सुरू केल्याचा इतिहास आहे. मुलांना बैलाच्या कष्टाचे मोल कळावे व त्यांना आनंद मिळावा हा त्यामागचा उद्देश. पुढच्या काळात हा उत्सव मुलांच्या कल्पकतेच्या सृजनाचे प्रतीक झाला आणि सुतार कारागिरांच्या रोजगाराचे माध्यम. हा एका दिवसाचा सण मात्र बच्चेकंपनी वर्षभर आठवण करीत असतात. मुलांनी हट्ट करायचा आणि पालकांनी त्यांच्यासाठी लाकडाचा नंदी आणायचा. मग मुले आपल्या नंदीला रंगरंगोटी करून व वेशभूषा घालून सजवितात. पुढे गावभर मिरवणूकही काढली जाते. लोक कौतुकाने मुलांना प्रोत्साहन आणि पैसेही (बोजारा) देतात. नागपूर शहरातील अनेक भागात विविध राजकीय, सामाजिक संघटनांकडून तान्हा पोळ्याच्या स्पर्धा व मिरवणुकांचे आयोजन केले जाते.
यावर्षी कोविडच्या प्रकोपामुळे सार्वजनिक स्पर्धा व मिरवणूक काढण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र आईवडिलांनी मुलांचा आनंद कमी होऊ दिला नाही. बहुतेक चौकात लाकडी बैलांची दुकाने लावण्यात आली आहेत. पालकांनी मुलांसाठी दोन दिवसांपासून नंदीची खरेदी केली. मुलांनीही त्या नंदीला आकर्षक पद्धतीने सजवून, वेशभूषा परिधान करून आनंद लुटला. त्या नंदीची पूजाही करण्यात आली. मिरवणुकीत जाता येत नसले तरी पालकांनी फोटो काढून सोशल मीडियावर मुलांच्या सृजनाचे प्रदर्शन केले.
मिरवणूक नाही पण ऑनलाईन स्पर्धा
शहरात वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये तान्हा पोळानिमित्त नंदी सजावट, फॅ न्सी ड्रेस स्पर्धा व मिरवणूक काढली जाते. तोरण बांधून सजविलेल्या नंदींसह मुले यात सहभागी होतात. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आणली आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्पर्धा व मिरवणुका काढण्यापासून संस्थांनी माघार घेतली आहे. मात्र काही संस्थांकडून ऑनलाईन सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जुना सुभेदार ले-आऊट भागात अमर शहीद विजय कापसे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी संस्थेने ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे. घरीच नंदी सजवून आकर्षक वेशभूषेत फोटो काढून संस्थेच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आकर्षक बक्षीसही ठेवले आहे.