जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
By योगेश पांडे | Published: July 5, 2024 12:34 AM2024-07-05T00:34:24+5:302024-07-05T00:34:44+5:30
घरच बळकावल्याने आईला घ्यावा लागला वृद्धाश्रमाचा आधार
नागपूर : जन्मदात्या आईला घराचे सुख मिळावे यासाठी मुले जीवाचे रान करताना दिसून येतात. मात्र समाजात काही कुपूत्र असेदेखील आहेत, जे केवळ आईच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतात. नागपुरातीन दोन घटनांतून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. दोन्ही घटनांमध्ये मुलांनी स्वत:च्या आईच्या हक्काची मालमत्ता अक्षरश: ओरबाडून घेतली. एका प्रकरणात तर मुलाने रजिस्ट्रीच्या वेळी खोटी आईच उभी केली व खऱ्या आईला त्यामुळे आता वृद्धाश्रमात जावे लागले आहे. जरीपटका व मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दोन घटना घडल्या आहेत.
पहिल्या घटनेत मीना मुरलीधर निपाने (७०, हिंद स्वामी समर्थ संकुल, झिंगाबाई टाकळी) ही दुर्दैवी माता आहे. मीना व त्यांचे पती मुरलीधर यांना अभिजीत व अनिकेत अशी दोन मुले आहेत. अभिजीतची वर्तणूक चांगली नसल्याने तो १४ वर्षांपासून वेगळा राहत होता तर अनिकेत गोव्याला राहतो. कोरोनात निपाने दाम्पत्य लहान मुलाकडे रहायला गेले. दरम्यानच्या काळात अभिजीतने मीना यांच्या जागेवर खोटी महिला उभी करून त्यांचे गोरेवाडा येथील दोन भूखंड ६० लाखांना विकले. ही बाब मीना यांना कळाल्यावर त्या मार्च महिन्यात पतीसह नागपुरात परतल्या. मात्र अभिजीत त्यांना त्यांच्या घरात त्याच्या पत्नीसह दिसला. त्याने त्यांना घरात प्रवेश नाकारला व बाहेर काढले. मीना यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली व त्या पतीसह एका वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेल्या. दुय्यम निबंधक कार्यालयातून विक्रीपत्राची प्रत मिळविली असता त्यात त्यांच्या ऐवजी भलत्याच महिलेचा फोटो असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात अभिजीत, डमी महिला, व साक्षीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
निरक्षर आईचा अंगठा घेऊन मुलाने केला दुकानावर कब्जा -
निरक्षर आईचा अंगठा घेऊन मुलाने दुकान हस्तगत केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात आईने मुलाविरोधातच पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
भोजंताबाई मारोतराव शेंडे (८०, त्रिरत्ननगर) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्यांना पाच मुले व दोन मुली आहेत. त्यांच्या पतीने इंदोरा येथील मॉडेल टाऊनमधील दुकान विकत घेतले होते. त्याचे दोन भाग केले होते व एक भाग अनिल या मुलाला दिला होता तर एक भाग स्वत:कडेच ठेवला होता. २०२० साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर मनोज व राजेश या मुलांनी दुकानावरील नाव मिटविले व कुलूप तोडून त्यावर कब्जा केला. भोजंताबाई यांनी विचारणा केली असता राजेशने ते दुकान त्यांच्या नावावर करुन देण्याची प्रक्रिया करून देतो अशी बतावणी केली. १५ जून २०२१ रोजी त्याने दुकान नावावर करून देण्याच्या नावाखाली त्यांचा स्टँपपेपरवर अंगठा घेतला. मात्र प्रत्यक्षात त्याने ते दुकान मनोज व स्वत:च्या नावे करून घेतले होते. ऑक्टोबर महिन्यात मनोजचा मृत्यू झाला व त्यानंतर राजेशने दुकान स्वत:च्या ताब्यात घेतले. आई निरक्षर असल्याचा फायदा घेत त्याने त्यांची फसवणूक केली. ही बाब समोर येताच भोजंताबाई यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात मुलगा राजेशविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.