अंगणवाड्यांतील बालकांना तीन महिन्यांपासून पोषण आहार नाही
By गणेश हुड | Published: March 30, 2024 08:34 PM2024-03-30T20:34:04+5:302024-03-30T20:34:31+5:30
पुरवठादार बदलल्याचा परिणाम : कुपोषणात भर पडण्याची शक्यता
नागपूर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये कार्यरत अंगणवाड्यांतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना तसेच स्तनदा मातांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून पूरक पोषण आहार पुरविण्यात येतो. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांमध्ये हा आहार पोहोचला नाही.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, कुपोषित बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. या घटकांतील कुटुंबांचे पोषण व्यवस्थितरित्या व्हावे, म्हणून ही योजना लाभार्थ्यांना लाभदायी ठरली आहे. सध्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारात चवळी अथवा चना प्रतिदिन प्रति लाभार्थी ३० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ २० ग्रॅम, गहू ८० ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम व साखर २० ग्रॅम असा एकूण १६६ ग्रॅम वजनाचा आहार प्रतिदिन द्यायचा आहे. तर गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना चवळी अथवा चना प्रतिदिन प्रतिलाभार्थी ४० ग्रॅम, मूगडाळ अथवा मसूरडाळ ३१.५ ग्रॅम, गहू ८८ ग्रॅम, मिरची पावडर चार ग्रॅम, हळदी पावडर चार ग्रॅम, मीठ आठ ग्रॅम, साखर २० ग्रॅम असा दररोज १९५.५ ग्रॅम पूरक पोषण आहार पॅकिंग करून द्यावयाचा आहे. परंतु, मागील तीन महिन्यांपासून अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पोहोचत नसल्याने प्रशासन कुपोषणाबाबत किती गंभीर आहे, याचा प्रत्यय येत आहे. परिणामी, प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून पोषण आहार पुरवठा करण्याची मागणी होत आहे.