"हिंसा थांबवायची असेल, तर मुलांना संस्कारित करण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:03 AM2021-03-26T06:03:45+5:302021-03-26T06:04:54+5:30

आचार्यश्री महाश्रमणजी यांच्याशी सकल जैन समाज राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांचा वार्तालाप

"Children need to be educated if violence is to stop" | "हिंसा थांबवायची असेल, तर मुलांना संस्कारित करण्याची गरज"

"हिंसा थांबवायची असेल, तर मुलांना संस्कारित करण्याची गरज"

Next

नागपूर : हिंसा थांबवायची असेल तर शाकाहाराला अधिक वाव देण्याची गरज आहे. त्यामुळे खानपानावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. यासाठी मुलांना लहानपणापासूनच संस्कारित करण्याची गरज आहे, असे मत अहिंसा यात्राचे प्रणेते तेरापंथ समाजचे आचार्यश्री महाश्रमणजी यांनी गुरुवारी व्यक्त केले. हिवरी नगर येथील अनुव्रत भवनात आचार्यश्री यांच्याशी सकल जैन समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी वार्तालाप केला. या विशेष भेटीदरम्यान त्यांनी हे आवाहन केले. 

विदेशामध्ये मुलांना संस्कार मिळतात. मात्र आपल्याच देशात लोक ते विसरताना दिसत असल्याची खंत दर्डा यांनी व्यक्त केली. यावर तोडगा काय, अशी विचारणा केली असता आचार्यश्री बोलत होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये जैन समाजाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, या दर्डा यांच्या प्रश्नावर ते म्हणाले, देशभरातील जैन समाजामध्ये आज एकजूट दिसते. जैन समाजाच्या सिद्धांतावर आणि मानवी मूल्याच्या वाटेवरून सर्वजण प्रवास करताना दिसत आहेत. देश-विदेशात राहणाऱ्या मुलांपर्यंतसुद्धा  ऑनलाइनच्या माध्यमातून हे सिद्धांत आणि मूल्य पोहचविण्याची गरज आहे. साधूसंतांच्या सान्निध्याचा पुण्यलाभ घेऊ न शकणारे अनेक लोक आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कसे जोडायचे, या प्रश्नावर आचार्यश्री म्हणाले, अमेरिकेमध्ये जैन संस्थेच्या माध्यमातून द्विवार्षिक संमेलन आयोजित करून हा प्रयत्न केला जातो. भारतामध्येसुद्धा अशा संमेलनांच्या माध्यमातून समाजाला जागृत केले जाऊ शकते. स्थानिक संस्थांनी सर्वांपर्यंत पोहचून धर्माचा प्रचार करावा, असा संदेश त्यांनी दिला. 

यांची होती उपस्थिती : या दरम्यान आचार्यश्री संघचे मुख्य मुनिश्री महावीरजी, मुनिश्री कुमार श्रमणजी, कीर्ति मुनिश्री, बिस्तृत मुनिश्री, अक्षय मुनिश्री, योगेश मुनिश्री, दिनेश मुनिश्री, गौरव मुनिश्री, सकल जैन समाजचे उपाध्यक्ष अनिल पारख, भारतीय जैन संगठनचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पारख, महामंत्री निखिल कुसुमगर, पदाधिकारी संतोष पेंढारी व अतुल कोटेचा, दिलीप राका, सुरेंद्र लोढा, जैन क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील पारख, सर्व मानव समाजचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेचे अध्यक्ष सुनील छाजेड, उपाध्यक्ष विजय राका व संजय पुगलिया, सचिव राकेश धारीवाल, सहसचिव विनोद डागा व विकास बुच्चा, कोषाध्यक्ष पवनकुमार जैन, निवर्तमान अध्यक्ष कन्हैयालाल बघेल, मार्गदर्शक अरुण भंडारी, कमल सिंह चोपडा, गुलाबचंद छाजेड, श्रीकांत छल्लानी, महेंद्र आचलिया आदी उपस्थित होते.

२०२४ मधील चातुर्मासासाठी विनंती 
२०२३ मध्ये आचार्यश्री यांचा चातुर्मास मुंबईमध्ये आहे. सकल जैन समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या भेटीदरम्यान, २०२४ मधील चातुर्मास नागपुरात करावा, अशी आग्रहपूर्वक विनंती त्यांना केली. नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. या चातुर्मासाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आचार्यश्री यांचे आशीर्वचन पोहचले जातील. या चर्चेदरम्यान दर्डा यांनी नागपुरात झालेल्या चार भव्य आणि यशस्वी चातुर्मासांच्या आयोजनाची माहिती दिली.

जैन समाजाला अत्यंत कठोर परिश्रमानंतर अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे समाज संघटित होण्यासाठी आपल्या आडनावामध्ये ‘जैन’ लिहिण्यासाठी समाजातील सर्वांना आपल्या प्रवचनातून प्रेरित करावे, अशीही आग्रही विनंती दर्डा यांनी यावेळी केली. सध्या समाजासाठी बजेट कमी आहे. ते वाढले तर समाजातील गरीब आणि वंचितांचा विकास होईल. यावेळी दर्डा यांनी आचार्यश्री यांना ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लियामेंट’ हे स्वलिखीत पुस्तक तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेले ‘माझी भिंत’ हे पुस्तक भेटीदाखल दिले. आचार्यश्री यांनी जैन समाजामध्ये संवत्सरी एकत्रित मनविण्याला सुरूवात केली आहे, असे मुनिश्री यांनी या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमादरम्यान श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने विजय दर्डा यांचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: "Children need to be educated if violence is to stop"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.