तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मुलांच्या लसीकरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:43+5:302021-05-09T04:07:43+5:30
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून येत ...
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात २० हजार ८१० मुले बाधित झाली आहेत. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणून तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांवरील उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यासोबतच लहान मुलांनाही जास्तीत जास्त संख्येने लस देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय आहे. लस घेतल्याने कोरोनाची गंभीरता कमी होऊन मृत्यूदर कमी होण्यास मदत होत असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यात ‘हेल्थ वर्कर’ला व नंतर ‘फ्रंटलाईन वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १ एप्रिलपासून लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचेही लसीकरण हाती घेण्यात आले. लहान मुलांचे लसीकरण अद्यापही दूर असल्याने व त्यांच्याकडून कोराना प्रतिबंधक नियमांचे योग्य पद्धतीने पालनही होत नसल्याने तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे.
-या कंपन्या तयार करीत आहे मुलांसाठी लस
कोरोनाची लस तयार करणाऱ्या कंपन्यापैकी एक असलेली ‘फायजर’ आणि ‘बायोएनटेक’ची कोरोना लस लहान मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे. १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ‘फायजर’ची लस १०० टक्के प्रभावी ठरल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अमेरिकेत एकूण २ हजार २५० लहान मुलांवर या फायजरच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली. फायजरसोबतच अमेरिकेची ‘मॉडर्ना’ ही आणखी एक कंपनी कोरोना लसीची लहान मुलांवर चाचणी करीत आहे. यात १२ ते १७ वर्षे व ६ महिने ते ११ वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश असणार आहे. भारतात ‘भारत बायोटेक’ कंपनी ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर मानवी चाचणी करण्याच्या तयारीत आहे. परंतु अद्याप याला मंजुरी मिळाली नाही.
-‘ट्रायल’ला अद्यापही मान्यता नाही()
भारत बायोटेक कंपनीचे ‘कोव्हॅक्सिन’ लसीची नागपुरात लहान मुलांवर मानवी चाचणी (ट्रायल) होणार आहे. याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्यापही मंजुरी मिळाली नाही. २ ते १७ वर्षातील मुलांवर ही ‘ट्रायल’ होणार आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये होत असलेला बदल पाहता व लसीकरणापासून अद्यापही लहान मुले दूर असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक लहान मुले बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुलांच्या लसीकरणासाठी वेगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ
-तिसऱ्या लोटत आपण कमी पडायला नको()
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक लागण ५५ वर्षांवरील व्यक्तींना झाली. त्या तुलनेत तरुण व लहान मुलांची संख्या फारच कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसोबतच तरुणांची संख्या वाढली. काही प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोना दिसून येत असला तरी गंभीरता नाही. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असल्याने व लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता असल्याने आपण कमी पडायला नको. यात लहान मुलांच्या लसीकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शासनाने याला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.
-डॉ. संजय मराठे, बालरोगतज्ज्ञ
-लसीकरणाच्या दृष्टीने वेगाने प्रयत्न आवश्यक()
सध्यातरी कोरोना प्रतिबंधक लस लहान मुलांसाठी उपलब्ध नाही. परंतु त्या दृष्टीने वेगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. लसीकरण झाल्यास केवळ आजाराची गंभीरताच कमी होणार नाही, तर त्यांच्यापासून लागण होण्याची शक्यताही कमी होईल. एका नियमात राहून शाळा सुरू होण्यास मदत होईल. मानसिक तणाव काहीसा कमी होईल.
-डॉ. राजेश अग्रवाल, बालरोगतज्ज्ञ