नागपुरातील १८ वर्षांखालील मुलांना देवदर्शन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 08:00 AM2021-09-30T08:00:00+5:302021-09-30T08:00:17+5:30
Nagpur News १८ वर्षांखालील मुलांना धार्मिक स्थळी प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
नागपूर : येत्या ७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी नागपुरातील मंदिरांसह सर्वच धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येतील; परंतु ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. (दोन्ही डोस) त्यांनाच प्रवेश राहील. १८ वर्षांखालील मुलांना धार्मिक स्थळी प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
या आदेशात आवश्यक दिशानिर्देशही जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळी तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक राहील. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांना तापमान तपासणी सुविधा, तसेच हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करणे बंधनकारक राहील.
धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांनी कोविड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यात किंवा दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. लसीकरण प्रमाणपत्र व ओळखपत्र आवश्यक राहील. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा उल्लेख असलेले आदी. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसल्याने त्यांना प्रवेश मिळणार नाही. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.