Corona Vaccination; लहान मुलांना मोठ्यांचीच कोव्हॅक्सिन दिली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 07:59 AM2021-05-22T07:59:33+5:302021-05-22T08:00:17+5:30
Coronavirus in Nagpur सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्यांना दिली जाणारी कोव्हॅक्सिनची लस चाचणीत सहभागी लहान मुलांना दिली जाणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा गंभीरतेपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी लवकरच नागपुरात सुरू होणार आहे. २ ते १८ वयोगटांतील जवळपास १७५ मुलांवर ही चाचणी होईल. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्यांना दिली जाणारी कोव्हॅक्सिनची लस चाचणीत सहभागी लहान मुलांना दिली जाणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.
लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील लोकांचे होत असलेले लसीकरण, कोरोना विषाणूमधील ‘म्युटेशन’ (बदल) व कोरोना प्रतिबंधक नियमाचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच भारत बायोटेक कंपनीला लहान मुलांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या ‘ट्रायल’साठी भारतीय औषधी महानियंत्रकने (डीसीजीआय) मंजुरी दिली. यामुळे ‘एम्स’ पाटना, फेलिक्स हॉस्पिटल नोयेडा, इन्स्टियूट आफ चाईल्ड निलोफर हॉस्पिटल हैदराबाद व नागपुरात वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांना या चाचणीसाठी परवानगी दिली. भारतात एकूण ५२५ सदृढ आरोग्य असलेल्या मुलांवर ही चाचणी केली जाणार आहे.
तीन वयोगटांत चाचणी
डॉ. खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन वयोगटांत विभागण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात जवळपास २५ मुले-मुलींचा सहभाग राहणार आहे. यामध्ये सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची समितीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी लवकरच नोंदणीला सुरुवात होणार आहे. परंतु आतापासून अनेक पालकांकडून या संदर्भात विचारणा होत आहे.
रक्ताच्या चाचणीनंतरच निवड
लहान मुलांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. सोबतच अॅण्टिबॉडी तपासणी केली जाईल. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यावर मुलाची निवड होईल. पहिला डोस ‘०.५ एमएल’चा दिला जाईल. त्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. त्यापूर्वी रक्ताची चाचणी केली जाईल. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक पथक राहणार आहे. ते फोनद्वारे मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या संपर्कात राहतील. इथिकल समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल.