Nagpur: मुलांचा वाद ठाण्यात पोहोचला, मुन्ना यादवने घातला राडा, ‘डीसीपी’ला धक्काबुक्की केल्याने घेतले ताब्यात
By दयानंद पाईकराव | Published: October 6, 2024 12:09 AM2024-10-06T00:09:18+5:302024-10-06T00:09:50+5:30
Nagpur Crime News: राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांच्यातील आपसी वादाने शनिवारी रात्री पुन्हा डोके वर काढले. दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत चार जण जखमी झाले.
नागपूर - राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांच्यातील आपसी वादाने शनिवारी रात्री पुन्हा डोके वर काढले. दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत चार जण जखमी झाले. यातील एका जखमीला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यामुळे पोलिसांनी मुन्ना यादव यांना उशिरा रात्री ताब्यात घेतले. परंतु वरिष्ठ पातळीवरून गुन्हा दाखल न करण्याचे आदेश मिळाल्यामुळे पोलिसांनी मुन्ना यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मुन्ना यादवची मुले करण आणि अर्जुन घराजवळ असलेल्या देवीच्या मंडपाजवळ उभे होते. तेवढ्यात बाला यादवची मुले आपल्या साथीदारांसह तेथे आली. त्यांनी करण आणि अर्जुनला मारहाण केली. त्यानंतर करण आणि अर्जुन आपल्या समर्थकांसह बाला यादवच्या घरी गेले. तेथे त्यांनी बाला यादवच्या मुलांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांनी एकमेकांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. थोड्या वेळात धंतोली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात आणले. काही वेळातच मुन्ना यादव यांचे भाजपातील समर्थक आणि बाला यादव यांचे समर्थक धंतोली ठाण्यात पोहोचले. धंतोली ठाण्यातही दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करून भांडण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात झोन २ चे पोलिस उपायुक्त राहुल मदने धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान मुन्ना यादवने पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. यामुळे पोलिसांनी मुन्ना यादवला ताब्यात घेतले. ‘डीसीपी’ मदने यांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना धंतोली पोलिसांना केली. दरम्यान आपसात झालेल्या मारहाणीत एका जखमीला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत धंतोली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते.
पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संताप
मुन्ना यादव यांनी डीसीपी मदने यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मुन्ना यादव विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एका भाजप आमदाराने पोलिसांवर दबाव टाकला. काही वेळातच वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्यामुळे मुन्ना यादव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस उपायुक्त मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असून सध्या काहीच सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले.