बच्चेकंपनीचा एन्जॉय : सुट्या सार्थकी लावण्यासाठी क्लास, शिबिरे, ट्रॅकिंगची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:03 AM2019-05-20T11:03:01+5:302019-05-20T11:03:24+5:30
मे महिना लागला की मुलांना चाहूल लागते ती उन्हाळ्याच्या सुट्यांची. मग एकदा का परीक्षा संपली की मुलांच्या मनात आनंदाचे कारंजे उडायला लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मे महिना लागला की मुलांना चाहूल लागते ती उन्हाळ्याच्या सुट्यांची. मग एकदा का परीक्षा संपली की मुलांच्या मनात आनंदाचे कारंजे उडायला लागतात. शाळा सुरू झाल्यापासून परीक्षा संपेपर्यंत मुले सतत क्लास, गृहपाठ, अभ्यास, विविध परीक्षांची तयारी यातच गुंतलेली ही बच्चेकंपनी, हुश्श... संपली एकदाची परीक्षा म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडतात. किमान पहिलीपासून सातवी ते आठवीपर्यंतच्या मुलांची ही भावना तर असतेच. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली. पण शेवटी सुट्या या सुट्याच असतात आणि मुलांना खरोखरीच त्याचे अप्रूप असते. तर मुलांच्या परीक्षा संपल्या आणि या सुट्यांमध्ये ही मुले वेगवेगळ्या प्लॅनिंगमध्ये गुंतली.
पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांचा सर्वात आवडता बेत म्हणजे मामाच्या, आजी-आजोबांच्या गावाला जाणे. मग पालकही या तयारीने असायची आणि बॅग पॅक करून ‘झुक झुक अगिन गाडी...’म्हणत ही स्वारी एन्जॉय करण्यासाठी नातेवाईकांच्या गावाला निघायची. आता काळ बदलला, संयुक्त कु टुंब नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काहींच्या आयुष्यात हे सुवर्ण क्षण आजही आहेत, इतरांसाठी मात्र परिस्थिती निराशाजनकच आहे. त्यामुळे मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की नोकरदार पालकांचे मात्र टेन्शन वाढते. मुलांना या सुट्यांमध्ये कुठेतरी गुंतविण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आता मात्र नवनव्या गोष्टी शहरात उपलब्ध झाल्या आहेत. कुठे संगीत क्लास, चित्रकला, हस्तकला अशा कलागुणांना वाव देणारी शिबिरे तर कुठे टेकड्यांवर ट्रॅकिंगची सफारी. मग मुलांच्या सुट्या सार्थकी लागाव्यात आणि आपल्याही मागचा चिडचिड भूंगा दूर व्हावा म्हणून पालक मुलांना अशा शिबिरात किंवा क्लासला पाठवितात. हल्ली संस्काराचं आऊटसोर्सिंग सुरू झाल्यानं मुलांना संस्कार वर्गातही धाडले जाते. मुलांच्या या सुट्यांची सफर जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
उद्यान, मैदानात क्रिकेट, घरी कॅरम
विविध शिबिरे, सहली व ट्रॅकिंगच्या आनंदासह मुले या सुट्यांमध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. ज्यांना अशा शिबिरांमध्ये जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी तर आनंदाचा हमखास पर्याय आहे. अर्थातच दुपारचे उन्ह टाळूनच हा आनंद घेतला जात आहे. सकाळ, संध्याकाळ मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट, फुटबॉल व बॅडमिंटनचाही आनंद लुटत आहेत. शिवाय विविध मैदाने व उद्यानातही सकाळ-संध्याकाळ खेळणाऱ्या मुलांची किलबिल बघायला मिळत आहे. दुपारी घरामध्ये कॅरम, लुडो, अष्टाचौआ, पत्त्यांचेही खेळ रंगले आहेत.
सहली, किल्ले सफारी व ट्रॅकिंगमध्ये मुलांची आवड
मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की कुठेतरी सहलीला जाण्याचा त्यांचा बेत असतो. पालकांनीही त्यानुसार आपले प्लॅनिंग केलेले आहे. उन्हाळ्याचा तडाखा पाहता हिलस्टेशन व थंड भागात जाण्याकडे पालकांचा रोख अधिक आहे. याशिवाय ट्रॅकिंग शिबिरात जाण्याकडेही कल वाढला आहे. मुलांना जंगल सफारी व उंच टेकड्यांवर ट्रॅकिंगला नेणाºया काही संस्था नागपुरात सुरू आहेत. या संस्थांमध्ये एप्रिलपासूनच पालकांनी आपल्या पालकांची नोंदणी केली आहे. दुसरीकडे किल्ले सफारी करण्यातही मुलांची आवड वाढली असून, अनेक जण मुलांना घेऊन वेगवेगळे किल्ले पाहण्यासाठी रवाना झाले आहेत. शिवरायांच्या उंच गडावर ट्रॅकिंग करण्याचा आणि किल्ल्यांचा अभ्यास करण्याचा उद्देशही पूर्ण होत आहे.
कला कौशल्याची शिबिरेही फुल्ल
चित्रकला, हस्तकला, शिल्पकला अशा विविध कला कौशल्यांचे मार्गदर्शन करणाºया अनेक शिबिरांचे आयोजन सध्या शहरामध्ये केले जात आहे. विविध सेवाभावी संस्थांसह व्यावसायिक संस्थांनीही मुलांच्या सुट्यात अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. लक्ष्मीनगरच्या बालजगतमध्ये अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, यात मुलांचा उत्साही सहभाग दिसून येत आहे. नुकतेच बालजगततर्फे बाहुला-बाहुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते व हे लग्न बच्चेकंपनीने फुल्ल एन्जॉय केले. पेंटिंग आणि हस्तशिल्पकला तसेच मातीवर मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षणही मुले हिरीरीने भाग घेत आहेत.
मोबाईल, टीव्ही आणि पुस्तकही
पूर्वी कॉमिक्सची धूम असायची. आज कॉमिक्सबाबत मुलांना फारशी कल्पना नाही. पण वेगवेगळ्या गोष्टींची, प्रेरणादायी पुस्तक वाचण्याकडे मुलांचा कल दिसून येत आहे. शिवाय मोबाईल गेम आणि टीव्ही सोबतीला आहेच. मुलांचे अधिक मोबाईलवर वेळ घालविणे हेही पालकांसाठी चिंतेचे कारण असले तरी भर दुपारी पर्याय नसल्याने मोबाईलवर विरंगुळा शोधला जात आहे.
संगीत क्लासेस, संस्कार शिबिरात गर्दी
बहुतेक मुलांना संगीताची आवड असते. आता तर ही आवड अधिक वाढली आहे. पालकही याबाबत जागृत झाले असून, आपल्या मुलाने एखादे वाद्य शिकावे, यासाठी त्यांचा भर असतो. शहरात असे अनेक संगीत क्लासेस असून, त्यात मुलांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे संगीताचे सूर घरातूनही ऐकायला येत अहेत. कुठे गिटारवर हात फेरणारा स्वप्निल, इकडे पियानोवर हलके हलके हात चालवीत रियाही सुरांची सवय करीत आहे. तबल्यावर थाप मारणारा स्नेहल बाबांना आपले कौशल्य दाखवीत आहे. डान्स क्लासेसमध्येही मुलांनी धूम केली आहे. आजकाल मुलांना संस्कार मिळावे म्हणून पालक आग्रही भूमिका घेत असून, अशा संस्कार वर्गामध्ये मुलांना धाडण्याचाही कलही वाढला आहे. मुलांचा वेळ निघत आहे आणि सुट्या सार्थकी लागल्या म्हणून पालकही समाधानाचे सुस्कारे टाकत आहेत.