नागपुरात छोट्या आकारातील फटाक्यांना मुलांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 08:56 PM2019-10-26T20:56:04+5:302019-10-26T20:57:55+5:30
बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी इवलीशी टिकली आणि लवंगी फटाका यांच्यातही मोठा आनंद होता. दरम्यानच्या काळात कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचा फटाक्यांची मागणी वाढली. परंतु या फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण व जखमी होण्याचा धोका वाढल्याने गेल्या काही वर्षात हे फटाके मागे पडत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत.
दिवाळी हा प्रकाशाचा सण. तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. दुकानात बच्चे कंपनीबरोबर पालकांचीही गर्दी वाढली आहे. लवंगी, भुईचक्र, अनार, रोल व फुलझड्यांशिवाय एक तरी ‘फॅन्सी’ फटाका घेऊन जाण्याचा आग्रह लहान मुले धरताना दिसून येत आहे. ‘पायली’च्या नावाने ओळखले जाणारे ‘फॅन्सी’ फटाके सध्या बाजारात एक इंचापासून ते चार इंचच्या पायलीपर्यंत उपलब्ध आहेत. आकाशाता विविध रंगांची उधळण करणाºया या फटाक्याची किंमत १०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत आहे. या सोबतच ‘सेव्हन शॉट ते ‘वन थाऊझंड शॉट’ फटाका उपलब्ध आहे. याची किंमत १०० ते ७ हजार रुपयापर्यंत आहे. यात १२० शॉट असलेल्या ‘मस्का चस्का’फटाक्याला या वर्षी चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
चायना फटाक्यांमध्ये यावर्षी ‘गोल्डन येलो’ या फटाक्यात विसलिंग करत पिवळ्या रंगात जळणारा अनार व ‘स्काय एंगल टु इन वन’ यात वेगवेगळ्यात रंगात जळणारे अनार, त्याचवेळी आकाशात दुसऱ्या रंगाची उधळण करते. ‘चायना बॉन्टी क्रकलिंग’ हा फटाका विविध आवाज करीत आकाशात झेपावतो. ‘बुलेट ट्रेन’ यात मध्यम आकाराची पायली असून एकाचवेळी बुलेट ट्रेन सारखा आवाज करीत १०० शॉट निघतात. ‘एरियल मल्टी एवनलॉन्च’ यात एकापाठोपाठ २४० शॉट आकाशात विविध रंगाची उधळण करतात. ‘मायाजाल’ ‘चटाचट ज्युरासिक पार्क’ व ‘गील्टरिंग’ हे फटाके विविध आवाज करीत जमिनीवर फुटतात. हे सर्व फटाके १५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. रॉकेटमध्ये ‘मिसाईल रॉकेट’ हे यावर्षी लाल आणि हिरव्या रंगात आले आहे. सुतळी, लक्ष्मी बॉम्बच्या मागणीत घट झाली असल्याचे फटाका विक्रेत्याचे म्हणणे आहे.