कचरागाडीने घेतला बालकाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:57 PM2020-10-12T22:57:22+5:302020-10-12T23:00:43+5:30
Accident, child deathचारवर्षीय बालक त्याच्या घरासमोर खेळत असताना नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : चारवर्षीय बालक त्याच्या घरासमोर खेळत असताना नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कामठी शहरात सोमवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
इशू ऊर्फ लक्ष्य नीलेश बरसे (४, रा. गौतम नगर, छावणी, कामठी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील कचरा संकलनासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. इशू सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या घरासमोर समवयस्क मुलांसोबत खेळत होता. काही कळण्याच्या आत वेगात आलेल्या एमएच-४०/बीएल-७३२५ क्रमांकाच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने इशूला जोरात धडक दिली.
त्यात गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्याला लगेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व वाहन जप्त केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल चमेले करीत आहेत.