भाजीविक्रेत्यावर फेकले ‘तिखट’; पत्रकार आणि महिला पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 07:28 PM2020-06-23T19:28:00+5:302020-06-23T19:31:52+5:30
भाजीविक्रेत्यावर तिखट पावडर फेकून त्याची रक्कम लुटू पाहणाऱ्या एका गुन्हेगारावर पत्रकार आणि पोलिसांनी झडप घातली. त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून गुन्हेगार पळून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्याची रक्कम लुटण्याच्या इराद्याने चोराने आपले काम तर केले पण झाले उलटेच.. भाजीविक्रेत्यावर तिखट पावडर फेकून त्याची रक्कम लुटू पाहणाऱ्या एका गुन्हेगारावर पत्रकार आणि पोलिसांनी झडप घातली. त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून गुन्हेगार पळून गेला. सोमवारी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाजीबाजारात ही घटना घडली. त्यामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.
आयुर्वेद कॉलेजजवळ मोठा भाजीबाजार भरतो. सायंकाळी तेथे मोठी गर्दी असते. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी भाजीबाजारात गजबज होती. अचानक एका भाजीविक्रेत्याच्या दुकानात एक गुन्हेगार आला आणि त्याने त्याच्या डोळ्यात तिखट फेकून त्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे ज्येष्ठ पत्रकार राजेश्वर मिश्रा भाजी घेत होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या गुन्हेगाराची गचांडी पकडली. त्यामुळे आरोपीने त्याच्या हातातील तिखटपूड मिश्रा यांच्याही तोंडावर फेकली आणि तेथून पळ काढला.
या घटनेमुळे ग्राहकांनी आरडाओरड केली. ती ऐकून बाजूला असलेल्या दामिनी पथकातील दोन महिला पोलीस कर्मचारी तिकडे धावल्या. त्यांनी आरोपीचा पाठलाग केला; मात्र मैदानाच्या बाजूला असलेल्या झाडीतून आरोपी बिंझानी कॉलेजकडे पळून गेला. या घटनेमुळे भाजीबाजारात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, तिखट हल्ल्यामुळे भाजीविक्रेता आणि पत्रकार मिश्रा जखमी झाले. बाजारातील ग्राहकांनी पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांची मदत केली.