नागपुरात लाल मिरचीचा 'तिखटपणा' कायम : आवक कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:42 AM2019-11-22T00:42:33+5:302019-11-22T00:45:10+5:30
यंदा जास्त पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने लाल मिरचीच्या भावात वाढ होऊन जास्त ‘तिखट’ झाली आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव ८० ते ११० रुपये किलो होते. यावर्षी भाव १७० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा जास्त पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने लाल मिरचीच्या भावात वाढ होऊन जास्त ‘तिखट’ झाली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरही भाव कमी झालेले नाहीत. कोल्ड स्टोरेजमधील मिरची संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभी ग्राहकांना जास्त भावाने खरेदी करावी लागत आहे. कळमन्यात आवक कमीच आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव ८० ते ११० रुपये किलो होते. यावर्षी भाव १७० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत.
सध्या कळमना बाजारात चिखली, बुलडाणा तसेच स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून आवक आहे. आंध्र प्रदेशातून जवळपास आठ हजार पोत्यांची आवक झाली आहे. पावसामुळे उत्पादन येण्यास उशीर झाला. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून येणारी लाल मिरची ओली आहे. डिसेंबरच्या दुसºया आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता असून तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मिरचीचे व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशच्या काही भागातून मिरचीची आवक सुरू झाली आहे तर आंध्र प्रदेशातून मालाची आवक सुरू होण्यास सध्या उशीर आहे. तेथील बाजारात आवक सुरू झाली आहे. गुंटूरमध्ये भाव जास्त आहेत. जानेवारीपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही.
कोल्ड स्टोरेजमधील मिरचीचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. सध्या बाजारात मिरचीची मागणी वाढली आहे. त्या कारणामुळे किमतीत वाढ झाली आहे. डिसेंबरपर्यंत भाव कमी होणार नाहीत. पुढील महिन्यात मध्य प्रदेशातून लाल मिरचीची आवक वाढण्याची शक्यता आहे. ओली मिरची ८० ते १२० रुपये आणि सुकी मिरचीला १४० ते २०० रुपये भाव मिळत आहे. खम्मम आणि गुंटूर तेजा क्वालिटीला १६० ते १८० रुपये, ३३४ क्वालिटीला १२५ ते १५० रुपये भाव मिळत आहे.