ठरलं ! भिवापुरात होणार मिरचीवर आधारित प्रक्रिया उद्योग, नवउद्योजकांनी टाकले पाऊल
By जितेंद्र ढवळे | Published: April 20, 2023 02:59 PM2023-04-20T14:59:30+5:302023-04-20T15:00:06+5:30
नागपूर : जगाच्या पाठीवर लालभडक आणि तेजतर्रार मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी मिरचीचे आता कुठे भाग्य उजळतांना दिसत आहे. पहिल्यांदाच ...
नागपूर : जगाच्या पाठीवर लालभडक आणि तेजतर्रार मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी मिरचीचे आता कुठे भाग्य उजळतांना दिसत आहे. पहिल्यांदाच मिरचीवर आधारित प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पायाभरणीचे भूमिपूजन सुद्धा पार पडले आहे. भिवापुरातील नवउद्योजकांनी टाकलेले हे पहिले पाऊल भिवापुरी मिरचीचे भाग्य उजळण्यास मदतगार ठरणार आहे.
मिरची व मसाल्यावर आधारीत घरगुती व्यवसाय करणाऱ्या काही स्थानिक मंडळींनी एकत्रित येत, मिरचीवर आधारित प्रक्रीया उद्योग उभारण्याचा संकल्प केला. मात्र गत दोन-तीन वर्षात शासनाकडून पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता मात्र स्थानिक मंडळींच्या संकल्पाला शासनाकडून 'ग्रिन सिग्नल' मिळाला. अंदाजे ६ ते ७ कोटी रूपयांचा हा प्रक्रीया उद्योग असून यात सव्वा कोटी रूपयांच्या जवळपास स्थानिक मंडळीचे भागभांडवल आहे.
उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात शासनाकडून मिळणार आहे. उद्योग संचालनालय मार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम अंतर्गत भिवापूर ‘चिली प्रोसेसिंग फाऊंडेशन कस्टर’ असे मिरचीवर आधारित या प्रक्रिया उद्योगाचे नाव आहे. स्थानिक एमआयडीसी परिसरात शासनाकडून जवळपास दिड एकर जागा उद्योग उभारणीसाठी मिळाली आहे.