मिरचीचे उभे पीक पेटविले
By admin | Published: March 25, 2017 03:09 AM2017-03-25T03:09:11+5:302017-03-25T03:09:11+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही.
शेतकऱ्यांचा संताप : यावर्षी कमी भाव मिळाल्याने नाराजी
मांढळ : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीला कमी भाव मिळाला. शिवाय, बाजारात मिरचीला उठावही नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कुही तालुक्यातील किन्ही व पचखेडी येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील मिरचीचे उभे पीक उपटून त्याचे ढीग लावले आणि ते पेटवून दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
कुही तालुक्यात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने कुही तालुक्यातील पचखेडी आणि किन्ही येथील बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली होती. कारण, मागील वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी भावाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यावर्षी अनुकूल वातावरणामुळे मिरचीचे भरघोस पीक आले. त्यातच बाजारातील मिरचीची आवक वाढली आणि दुसरीकडे मागणी घटली. त्यामुळे मिरचीचे भाव कोसळल्याने अनेकांचा उपत्पादनखर्चही भरून निघाला नाही. मिरची तोडून ती बाजारात विकायला नेल्यानंतर मजुरीचा खर्चही भरून निघाला नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
सध्या मिरची तोडण्याची मजुरी प्रति मजूर १५० रुपये आहे तर ओल्या मिरचीला बाजारात दोन ते पाच रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. वाळलेल्या लाल मिरचीला प्रति किलो १५ ते २० रुपये किलो भाव मिळत आहे. झाडांची मिरची प्रत्येक शेतकऱ्याला मजुरांकरवीच तोडावी लागते. तोडलेल्या मिरचीतून तोडणीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी या मिरचीच्या पिकाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पचखेडी येथील फारूख सय्यद यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे मजुरांकरवी उपटून काढली तर पचखेडी येथील गुणवंता लांजेवार, भीमराव भोयर, प्रभू भोयर, किन्ही येथील कृष्णा तितरमारे यांनी त्यांच्या शेतातील मिरचीची झाडे ट्रॅक्टर व वखराच्या मदतीने उपटली. या झाडांचे शेतातच ढीग लावले आणि ते पेटविले. या प्रकाराची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पंचायत समिती सभापती सुनीता पडोळे, सुरेश येळणे, मांढळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, गुणाकार सेलोकर यांच्यासह अन्य नेत्यांनी लगेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
अत्यल्प बाजारभाव
आपण दरवर्षी मिरचीचे उत्पादन मे महिन्यापर्यंत घेत असल्याची माहिती बहुतांश शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी ओल्या मिरचीला प्रति क्विंटल दोन हजार रुपये तर सुकलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी अनेकांनी मिरचीच्या लागवडीला प्रथम पसंती दिली. अनुकूल वातावरणामुळे पीकही भरघोस आले. यावर्षी मात्र ओल्या मिरचीला प्रति किलो दोन ते पाच रुपये आणि वाळलेल्या लाल मिरचीला प्रति क्विंटल २५०० रुपये ते ३२०० रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडण्याजोगा नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.