मिरची महाग, भाज्या स्वस्त
By admin | Published: May 18, 2015 02:40 AM2015-05-18T02:40:10+5:302015-05-18T02:40:10+5:30
मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे.
नागपूर : मध्यंतरी पावसामुळे भाज्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून पीकही चांगले आले आहे. परिणामी स्थानिक उत्पादकांकडून आवक वाढली आहे. भाव गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आहेत. गृहिणींना आवडीच्या भाज्या सहज उपलब्ध होत आहेत.
स्थानिक उत्पादकांकडील हिरवी मिरची संपली आहे. बाहेरून माल येत असल्यामुळे मिरची महाग आहे. रविवारी कॉटन मार्केट बाजारात प्रति किलो भाव ३५ ते ४० रुपये होते, तर स्थानिक बाजारात ५० रुपये किलो विक्री झाली. सांभार २५ रुपये किलो भाव होते. याशिवाय वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, शेंगा, तोंडले, परवळ स्वस्त असल्याने ग्राहकांकडून मागणी आहे. कॉटन मार्केटमध्ये दररोज १५० ते १७५ लहानमोठ्या गाड्यांची आवक असून उन्हाळ्यात भाज्या आटोक्यात राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कांदे महाग, बटाटे स्वस्त
यावर्षी पावसामुळे पीक खराब झाल्याने उत्पादन कमी आहे. गेल्या काही दिवसांत कांदे महाग झाले आहेत. कळमना ठोक बाजारात लाल आणि पांढरे कांदे ५०० ते ५५० रुपयांवर (४० किलो) गेले असून किरकोळमध्ये भाव प्रति किलो २० रुपये आहेत. गेल्यावर्षी याच काळात कांदे ३०० ते ३५० रुपये होते. भाव वाढून प्रति किलो प्रति किलो ३० रुपयांवर गेले होते. यंदा पांढरा कांदा आणखी महाग होईल, अशी प्रतिक्रिया कळमना येथील आलू कांदे असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. सध्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून पांढरे कांदे तर बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यातून लाल कांद्याची आवक आहे. गुजरात आणि धुळे जिल्ह्यात काद्यांचे पीक फारच कमी आहे. सध्या सरासरी २० मोठ्या ट्रकची आवक आहे.
यंदा बटाट्याचे विक्रमी पीक झाल्याने भाव फारच कमी आहेत. कळमन्यात दर्जानुसार ३०० ते ४०० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये चांगल्या दर्जाचे बटाटे प्रति किलो १२ ते १५ रुपयांदरम्यान आहेत. सरासरी १६ ते २० ट्रकची आवक कानपूर, आग्रा आणि अहमदाबाद येथून माल येत आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बटाट्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि पीकही चांगले आले. यंदा गुजरात आणि पश्चिम बंगाल येथेही बटाट्याचे पीक जास्त आले आहे. शीतगृहातही माल पडून आहे. त्यामुळे यंदा भाववाढीची शक्यता नाही, असे वसानी म्हणाले.
(प्रतिनिधी)