चिमुकल्यांच्या सुगमातून, श्रेष्ठांच्या रागदरबारात रसिक बेधुंद न्हाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:22 AM2019-08-01T00:22:59+5:302019-08-01T00:29:00+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने २८ वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहात यंदा वसंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाचा योग साधला गेला. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप तेवढ्यात मुग्ध वातावरणात सांगितिक बैठकीने झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने २८ वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहात यंदा वसंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाचा योग साधला गेला. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप तेवढ्यात मुग्ध वातावरणात सांगितिक बैठकीने झाला.
तत्पूर्वी महोत्सवाच्या चौथ्या आणि अंतिम दिवसाचे उद्घाटन माजी आ. मोहन मते, उत्तर पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोव्हर, दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुरु ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. निशा कुळकर्णी व ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अविनाश सहस्रबुद्धे यांना सन्मानित करण्यात आले. तद्नंतर, सारेगम व संगीत सम्राट विजेती नंदिनी व अंजली अंगद गायकवाड या चिमुकल्या भगिनींचा ‘नाट्यसंगीत व भक्तिसंगीत’ कार्यक्रम पार पडला. दोन्ही भगिनींच्या सुगम स्वरांसोबतच वडील अंगद गायकवाड यांच्या भावगीतांनी रसिकांना भक्तिरसात न्हाऊन सोडले. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली व गायक भुवनेश कोमकली यांनी कुमार गंधर्वांच्या सांगितिक रचनचे विविध आयाम सादर केले. यावेळी, दमक्षे केंद्राचे उपसंचालक मोहन पारखी, कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी, प्रेमस्वरूप तिवारी, गोपाल बेतावार, शशांक दंडे, श्रीकांत देसाई, गणेश थोरात, दीपक पाटील, पदम जाधव, गजानन शेळके, उज्ज्वला इंदूरकर, रत्ना पुनवानी उपस्थित होते.
गायकवाड भगिनींच्या स्वरांत भक्तिरसाचा गोडवा
नंदिनी व अंजली गायकवाड या भगिनींनी ‘नाट्यसंगीत व भक्तिसंगीत’ या कार्यक्रमात उपस्थित रसिकांवर भक्तिरसाचा वर्षाव केला. दोन्ही भगिनींच्या स्वरांमध्ये असलेल्या विशिष्ट लयीत रसिकांना भक्तिरसाचा गोडवा शोधता आला आणि त्यात श्रोतृगण बेधुंद झाले. प्रथम तुला वंदितो कृपाळा... या श्रीगणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे.. सुरत पिया की.. बगळ्यांची माळ फुले.. कानडा राजा पंढरीचा.. तारीनी नव वसनदारीनी.. ही भाव व भक्तिगीते सादर केली. घेई छंद मकरंद.. हे नाट्यगीत अंजली व नंदिनी या दोघींनीही झपताल व त्रितालमध्ये वेगवेगळ्या शैलीत सादर केले तर, अंगद गायकवाड यांनी संवादिनीची संगत करतानाच, ‘दैव किती अविचारी’ व ‘कुणी जाल का सांगाल का’ हे दोन गीत गाऊन रसिकांना भुरळ घातली. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, की-बोर्डवर श्रीकांत पिसे, तालवादनावर विक्रम जोशी यांनी संगत केली.
‘गंधर्व स्वर’मध्ये कुमार गंधर्वांच्या रचना
कुमार गंधर्वांच्या रचनाविश्वातील काही निवडक गोष्टी घेऊन कलापिनी कोमकली व भुवनेश कोमकली यांनी ‘गंधर्व स्वर’ हा विशेष कार्यक्रम यावेळी सादर केला. कुमार गंधर्वांनी संगीताच्या प्रत्येक पैलूला हात घालत, त्याला सौंदर्य बहाल केले. त्यांच्या त्याच संगीतविश्वाला थोडक्यात सादर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यात गंधर्वांच्या बंदिशी, तराणे, अभंग, निर्गुण यांचा समावेश होता. कलापिनी व भुवनेश यांना ऐकण्यासाठी नागपूरकर रसिकांनी गर्दी केली होती, हेच त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात रसिकांनी कुमार गंधर्वांच्या रचनांचा वेगळ्या शैलीचा मनमुराद आत्मिक आनंद लुटला. यावेळी, तबल्यावर रामेंद्रसिंह सोलंकी, संवादिनीवर अभिषेक शिनकर, पखवाजवर राजगोपाल गोसावी यांनी संगत केली. नीरजा आपटे यांनी निवेदनातून कुमार गंधर्वांच्या विश्वाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला.
मुलींनी कलेच्या क्षेत्रात ‘सेटल’ व्हावे - अंगद गायकवाड
कलाक्षेत्रातील अनेकांसाठी मुंबई ही स्वप्ननगरी आहे. तेथे स्थायिक होण्याचे प्रयत्न अनेक जण करत असतात. अंजली व नंदिनी या दोघींनीही मुंबई सेटल होण्याऐवजी, कलेच्या क्षेत्रात सेटल व्हावे, अशी माझी इच्छा आहे. कलेच्या क्षेत्रात ते स्थायिक झाले की अवघं जग, त्यांचे गाव होईल, अशी भावना वडील अंगद गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.