चीनने भारतासह तिबेटचा विश्वासघातच केला : आनंदकुमार यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:20 PM2020-01-23T23:20:39+5:302020-01-23T23:26:21+5:30
भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘हिंदी-चिनी भाई भाई’ अशा घोषणा जगभर भारताकडून पसरविण्यात आल्यावरही चीनचाभारताबद्दलचा भाव बदलला नाही. पुढे चीनसाठी भारताचे प्रवेशद्वार असलेल्या तिबेटवर ताबा मिळवून आतंरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाब टाकणे सुरू ठेवले. भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली.
डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्र आणि भारत तिबेट मैत्री संघाच्या वतीने डॉ. आनंदकुमार यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगाच्या पाठीवर विदेशी साम्राज्य संपत असताना चीनच्या साम्राज्यवादाचा उदय होणे हे खेदजनक आहे. १९६८ मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविला. त्या प्रांतामध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसह अनेक प्रकल्प सुरू करून तिबेटी जनतेला प्रदूषणाच्या खाईत लोटले. तिबेटी जनतेने जीवापाड जपलेली वनसंपदा, जलसंपदा चीनने नष्ट केली. त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. भारतामधील प्रवेशासाठी तिबेट चीनकरिता प्रवेशद्वार असल्याचे लक्षात आल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र उभारणी केली.
तिबेटमधील जनतेला शिक्षण, संस्कृती, धन, खानपान यात स्वातंत्र्य हवे आहे. दलाई लामा भारतभर आणि जगभर फिरून तिबेटींच्या स्वातंत्र्याची मागणी करीत आहेत. मात्र चीन कूटनीतीने वागत आहे. तेथील जनतेवर अन्याय करीत आहे. तिबेटी तरुणींसोबत चीनचे पुरुष बळजबरीने विवाह करून नवा समुदाय निर्माण करू पहात आहेत. जगाच्या दृष्टीने ही खेदाची बाब आहे. दलाई लामा यांनी अद्यापही आपले काम थांबविलेले नाही. शांती, सुखाच्या मार्गावरून बुद्ध विचार प्रसृत व्हावा, ही त्यांची कामना आहे. स्वतंत्र झाल्यावर चीनला शत्रू मानणार नाही. शस्त्रांवर विश्वास ठेवणार नाही, तर शांती हाच मार्ग आहे, असे ते म्हणतात.
भारत नेहमीच तिबेटच्या बाजूने उभा राहिला आहे. जे.पी. नारायण, राममनोहर लोहिया, इंद्रजित गुप्ता, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेकांनी तिबेट बचावसाठी हिमालय बचावचा संदेश दिला आहे. हिमालयाला सांस्कृतिक अस्मिता आहे. ती वाचविण्यासाठी सर्वांनी आवाज बुलंद करण्याची गरज आहे.
प्रारंभी डॉ. राम मनोहर लोहिया अध्ययन केंद्राचे अध्यक्ष हरीश अड्याळकर यांनी प्रास्ताविक केले. परिचय सीताराम साहू यांनी करून दिला. तर भारत-तिबेट मैत्री संघाचे सचिव सचिन रामटेके यांनी आभार मानले.