शेतकरी आंदोलनात चीन-पाकिस्तानचा संबंध नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 02:56 PM2020-12-13T14:56:05+5:302020-12-13T15:10:20+5:30
सरकार सुधारणास तयार
नागपूर : शेतकरी आंदोलनावर अनेक भाजप नेते टीका करीत आहेत, या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपसुद्धा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहोचू शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले.
आठवले म्हणाले शेतकऱ्यांना ज्या सुधारणा हव्या असतील त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परन्तु सुधारणा करण्यास तयार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. थंडीमध्ये शेतकरी आहेत हे आम्हालाही चांगलं वाटत नाही, सरकारची संवादाची भूमिका आहे, शेतकऱ्यांनीही दोन पाऊल पुढे यावे, आंदोलन चिघळवणे बरोबर नाही. आंदोलनात पाकिस्तान किंवा चीनचा काही संबंध नाही, असे आठवलेंनी स्पष्ट केले. परंतु, केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी आंदोलनात माओवादी शिरल्याचे म्हटले आहे, याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, असे असेल तर त्याची चौकशी व्हावी. पत्रपरिषदेत महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, केंद्रीयमंत्री रावासाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनास चीन आणि पाकिस्तानचं पाठबळ असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, राज्यात दानवेंविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यांचा निषेध नोंदवत पुतळेही जाळण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावे
आठवले यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकट्याच्या भरवश्यावर सत्ता येऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.