चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:07 AM2019-11-22T00:07:15+5:302019-11-22T00:09:05+5:30
चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतर देशांच्या तुलनेत भारताच्या विकासाचा वेग जास्त आहे. मात्र देशासमोर सीमेवरील व अंतर्गत दहशतवादाची मोठी समस्या आहे. जर दहशतवाद व नक्षलवाद संपले तर भारताचा वेगाने विकास होईल. नेमकी हीच बाब चीनला माहीत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांमध्ये सातत्याने चीनचे पाठबळ राहिले आहे. चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.
विश्व संवाद केंद्रात त्यांनी देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या स्थितीबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. जर पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर त्या देशाचे किती तुकडे पडू शकतात याची जाणीव होते. सिंध प्रांत, बलुचिस्तानमध्ये तर खदखद आहेच. गिलगिट-बाल्टीस्तानमधील लोक भारतासोबत आहेत. एकेकाळी पाकिस्तानचे ९० टक्के सैन्य सीमेवर असायचे. आता ही संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत भागात दहशतवाद वाढला असून वरील राज्यांमध्येदेखील सशस्त्र विरोध सुरू आहे. अशा स्थितीत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणे भारतासाठी सहज शक्य आहे, असे हेमंत महाजन म्हणाले. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी हा देशासमोरील मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात कडक पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत ईशान्येकडील काही राज्यात बांगलादेशी मूळ असलेला मुख्यमंत्री पहावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारताने ‘एलओसी’सोबत सागरी सीमांवरदेखील गस्त वाढविण्याची गरज आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
भारताने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक तसेच कूटनीती शक्ती दाखविली आहे. मात्र आता सौम्यशक्तीचादेखील वापर करायला हवा. संस्कृती, कला, संगीत इत्यादींच्या माध्यमातून जगात एक वेगळा संदेश नेण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.