चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 09:43 PM2020-03-24T21:43:21+5:302020-03-24T21:49:58+5:30

चीन येथील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेड येथील डी मर्सी हॉटेलमध्ये कमरा नंबर २०८ मध्ये मुक्कामी होता. या घटनेनंतर उमरेड पालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Chinese pepper trader staying at hotel in Umred | चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

Next
ठळक मुद्देपालिकेच्या आरोग्य विभागाने बाळगली सतर्कता : डिसेंबरपासून वेगवेगळ्या भागात भारतभ्रमंती

अभय लांजेवार/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड ): चीन येथील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेड येथील डी मर्सी हॉटेलमध्ये कमरा नंबर २०८ मध्ये मुक्कामी होता. या घटनेनंतर उमरेड पालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अन्य यंत्रणेची सोबत न मिळाल्याने चीन येथील या व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलमधील मुक्काम दुपारपर्यंत लांबला. अखेरीस मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या सतर्कतेने नागपूरच्या मेयो इस्पितळात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला रवाना केले.

त्याच्यासोबत हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यासही पाठविण्यात आले आहे. हुआंग हॅन याचा पासपोर्ट क्रमांक ई४७०१२९४४ आहे. हॉटेल डी मर्सीने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला याबाबत कोणतीही सूचना दिली नाही, यावरून सर्वत्र टीकेची झोड उमटत आहे. हुआंग हॅन हा मिरचीचा व्यापार करण्यासाठी भारतात आल्याचे सांगत आहे. डिसेंबर २०१९ ला तो भारतात आल्याची बाब समोर येत असून या दरम्यान त्याने बºयाच ठिकाणी भारतभ्रमंतीसुद्धा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. केरळ राज्यातील कोची आणि दक्षिण भारतातील राची, नागपूर, उमरेड अशी प्रवासयात्रा हुआंग हॅन याने केली आहे. नागपूर येथील मँगो हॉटेल येथेही हॅन मुक्कामी होता, अशी माहिती त्याच्याकडून मिळाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी त्याची विचारपूस तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल सहारकर यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी केली. हुआंग हॅनची प्रकृती बरी असली तरीही त्याची कोरोना संसर्ग चाचणी करणे महत्त्वाचे असून त्याला आम्ही नागपूरच्या मेयो रुग्णालयात विशेष तपासणीसाठी रवाना करीत आहोत, अशी माहिती राजेश भगत यांनी दिली. तपासणीअंती अहवाल आल्यानंतरच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करावयाची की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विलास काळे यांना विचारणा केली असता, हॉटेल डी मर्सीने २ मार्चला हॅन आल्याची बाब पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर दुसऱ्यांदा १५ मार्चला आल्यानंतर काहीही कळविले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली. याप्रकरणी हॉटेलवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.

दोनदा मुक्काम
हॉटेल डी मर्सीला विचारणा केली असता, त्यांनी आधी दिनांक १५ मार्चपासून हुआंग हॅन असल्याचे सांगितले. पालिकेने नोंदणी बुकाची तपासणी केल्यावर तो या ठिकाणी २ मार्चलासुद्धा येऊन ११ मार्चला गेल्याचे दिसून आले. डिसेंबर २०१९ पासून मुक्कामी असलेल्या हॅनने बºयाचदा उमरेडला या हॉटेलमध्ये मुक्काम केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हॉटेलची लपवाछपवी
सोमवारी पालिकेचे आरोग्य निरीक्षक दिलीप चव्हाण आणि विशाल नाईक यांना ही बाब कळताच त्यांनी संबंधित यंत्रणेला सतर्क करीत हॉटेल डी मर्सी गाठले. या ठिकाणी असलेल्या व्यक्तीकडे विचारणा केली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि हॉटेल मालक यांनाही विचारणा करण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा विचारपूस सुरू झाली. हॉटेलमध्ये असलेल्या व्यक्तींपासून मालकापर्यंत साºयांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली.

हॉटेलवर कारवाई करा
संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाबाबत अत्यंत काळजी घेतली जात आहे. विदेशी पाहुणे तसेच महानगरातून आलेल्यांबाबत पोलीस ठाणे अथवा आरोग्य विभागास कळवा, असा फतवा देशभरात काढण्यात आल्यानंतरही सदर डी मर्सी हॉटेलने कोणतीही सतर्कता बाळगल्याचे दिसून येत नाही. पोलीस ठाण्यात चिनी पाहुण्याबाबत माहितीसुद्धा देण्याचे काम हॉटेलच्या वतीने करण्यात आले नाही. हॉटेलच्या ‘सी’ फॉर्म आणि परवानगीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

बांगलादेशी पाच दिवस
उमरेडच्या या डी मर्सी हॉटेलमध्ये बांगलादेश येथील नागरिकही दिनांक २ मार्च रोजी मुक्कामी होता, असे हॉटेलच्या नोंदणी बुकावरील नोंदीवरून लक्षात येत आहे. सदर बांगलादेशी कमरा क्रमांक २०९ मध्ये अर्थात चायनामॅनच्या खोलीलगतच पाच दिवस मुक्कामाला होता.

Web Title: Chinese pepper trader staying at hotel in Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.