सीमेवर चीनचे सैनिक भारतीय सैनिकांशी बिचकून वागतात - निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव
By नरेश डोंगरे | Published: July 20, 2024 11:50 PM2024-07-20T23:50:36+5:302024-07-20T23:51:01+5:30
भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक आपल्याशी बिचकून वागतात. ही त्यांची कमजोरी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव यांनी येथे केले.
नागपूर : लष्कराच्या बाबतीत आपण चीनपेक्षा कुठेच कमी नाही, उलट अधिक सक्षम आहोत. वायुदलात तर आपण चीनच्याही पुढे आहोत. त्यामुळे भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक आपल्याशी बिचकून वागतात. ही त्यांची कमजोरी आहे, असे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल एस. बी. देव यांनी येथे केले.
राजहंस प्रकाशन आणि डॉ. दंदे फॉऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित 'मेड ईन चायना' या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. शनिवारी सायंकाळी वनामती सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विशेष अतिथी म्हणून निवृत्त एअर मार्शल देव बोलत होते.
ते पुढे म्हणाले, आपण स्वत: भारत-चीन सीमेवर सैन्यात सेवा दिली आहे. चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने एका अपत्याचा कायदा आहे़ त्यामुळे चीनचे सैनिक भारतीय सैनिकांसोबत बिचकुन वागतात, हा त्यांचा ‘ड्रॉ बॅक’ असल्याचा उल्लेख देव यांनी केला़ चीनशी आर्थिक बरोबरी साधण्यासाठी आपल्याला चांगल्या अभियंत्यांची आवश्यकता आहे, असेही देव म्हणाले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, सर्वप्रथम देशाचा विकास नजरेसमोर ठेवून आयात, निर्यातीचे धोरण राबवावे लागेल. चिन आणि भारतातील उत्पादने, औद्यागिक, व्यापारी धोरण आणि आर्यात-निर्यात नितीवर बोलताना गडकरी यांनी अनेक उदाहरणे दिली. चिनची ज्या क्षेत्रात आहे त्या प्रत्येक क्षेत्रात भारताचीही सक्सेस स्टोरी व्हायला पाहिजे. प्रारंभी डॉ. पिनाक दंदे यांनी कार्यक्रमांची भूमिका विशद केली. कार्यक्रमाला राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले, आमदार कृपाल तुमाने, शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.