नागपुरातील चिंतलवार-माया टोळीचे गुंड हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:42 AM2017-12-18T00:42:46+5:302017-12-18T00:50:38+5:30
विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले.
चिंतलवार टोळीचा प्रमूख गुंड सुमित रमेश चिंतलवार (वय २९, रा. विश्वकर्मानगर,अजनी), शुभम ऊर्फ पेठ्या सुरेश गजघाटे (वय २५, रा. सावित्रीबाई फुलेनगर) तसेच माया टोळीचा प्रमुख शुभम ऊर्फ बबलू मनोहर फुलझेले (वय २४, रा. रामबाग) आणि त्याचा साथीदार पवन दयाराम चौधरी (वय २३, रा. गजानन अपार्टमेंट, बेसा पॉवर हाऊस जवळ, हुडकेश्वर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.
उपरोक्त दोन्ही गुंडांच्या टोळ्यांची अजनी, सक्करदरा आणि आजूबाजूच्या भागात प्रचंड दहशत आहे. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, पिस्तुलातून गोळीबार, घातक शस्त्राच्या धाकावर अपहरण, मारहाण, खंडणी वसुली, दंगे करण्यासह विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारीवृत्तीत फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून कुणाच्याही जानमालाला धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी या चार गुंडांना एकसाथ हद्दपार करण्याचे आदेश बजावले.
पोलिसांचे आवाहन
नागपूर शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता त्यांच्यावर हद्दपारीचा आदेश आहे. या कालावधीत हे किंवा त्यांच्यापैकी कोणताही गुंड नागपुरात अथवा आजूबाजूच्या गावात आढळल्यास तातडीने १०० क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फोन करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.