मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:03 IST2019-12-14T04:01:54+5:302019-12-14T06:03:57+5:30
सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे.

मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’
नागपूर : गेल्या काही वर्षात सरकारी मराठीशाळांना घरघर लागली आहे. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या शाळा बंद पडत आहेत किंवा पटसंख्येचे कारण देत बंद पाडल्या जात आहेत. शाळांच्या या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात शुक्रवारी शेकडो विद्यार्थी व पालकांनी जोगीनगर, रिंग रोडच्या भीमनगर मराठी प्राथमिक शाळेला कवटाळून शाळा वाचविण्यासाठी आपल्या संवेदना प्रकट केल्या.
सरकारी शाळा वाचवा अभियानाअंतर्गत सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीतर्फे गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या लक्ष वेधण्यासोबत सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. सुरूवातीला लाल शाळा आणि त्यानंतर सोमलवाडा येथील सरकारी शाळेत चिपको आंदोलन करण्यात आले. मराठी शाळांसाठी आंदोलन सुरू असल्याचे कृती समितीचे संयोजक दीपक साने यांनी सांगितले