चिरंजीव प्रसाद सांभाळणार नागपूर परीक्षेत्राची जबाबदारी; कोळसा तस्करी अन् अवैध दारू विक्रीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:00 PM2020-09-03T21:00:02+5:302020-09-03T21:00:12+5:30
सोमवारी सांभाळणार पदभार
नागपूर: जातीय दंगलीने होरपळून निघू पाहणाऱ्या औरंगाबाद शहराला शांतताप्रिय शहर अशी ओळख देण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसादनागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. राज्य सरकारने आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यातून येथील महानिरिक्षक के. एम. प्रसन्ना यांची औरंगाबादला तर औरंगाबादचे आयुक्त प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. सन १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद २०१८ पासून औरंगाबाद मध्ये पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
जानेवारी ते मे २०१८ या कालावधीत भीमा कोरेगांवमुळे औरंगाबाद येथे झालेली दंगल तसेच ११ मे च्या रात्री जुन्या शहरात झालेल्या जातीय दंगलीमुळे शहर होरपळून निघाले होते. या परिस्थितीत पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद रुजू झाले होते. त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध भागात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. बेरोजगार तरुण आणि महिलाना रोजगारभिमुख प्रशिक्षण देउन रोजगार मिळवून देण्याचा एक हाती कार्यक्रम राबविला. यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच पोलीस आणि जनतेतील अविश्वासाची दरी कमी करण्याचीही कामगिरी बजावली. यानंतर छोट्या मोठ्या घटनेचे रूपांतर दंगलीत होणार नाही, याची काळजी घेतली. यातून औरंगाबादला शांतताप्रिय शहर म्हणून ओळख मिळवून देण्यात प्रसाद यशस्वी ठरले. आता ते नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
या क्षेत्रात नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा हे चार जिल्हे येतात. त्यातील चंद्रपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे दारूबंदीचे जिल्हे म्हणून परिचित असले तरी या दोन्ही जिल्ह्यात देशी-विदेशी गावठी आणि बनावट विलायती दारू विकली जाते शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा तस्करीचा ही मोठा गोरख धंदा आहे. या गोरख धंद्याला आळा घालण्याची जबाबदारी प्रसाद यांच्यावर आहे. आपण दोन-तीन दिवसात नागपुरात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारू, असे त्यांनी लोकमत'शी चर्चा करताना सांगितले. परीक्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर प्राधान्याने काय करायचे, ते आपण ठरवू , असेही ते म्हणाले.