कारागृहाच्या भेसूर भिंतीआड होणार किलबिलाट; कैद्यांच्या अंगा-खांद्यावर खेळणार चिमुकले
By नरेश डोंगरे | Published: August 27, 2023 10:34 PM2023-08-27T22:34:26+5:302023-08-27T22:35:15+5:30
बंदिस्त कैद्यांच्या अंगा-खांद्यावर खेळणार चिमुकली : पुरी-भाजी, हलव्याचाही घेणार आस्वाद
नरेश डोंगरे
नागपूर : अनेक खतरनाक कैद्यांचा आवाज आतल्या-आत कोंडून ठेवणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाच्या भेसूर भिंतीआड लवकरच किलबिलाट होणार आहे. एक दोन नव्हे, शंभरावर चिमुकली कारागृहात जातील अन् आपल्या जिवलगाच्या अंगाखांद्यावरही खेळू शकतील. होय, कारागृह प्रशासनाने तसे नियोजन केले असून त्यासंबंधाने जोरदार तयारीही आतमध्ये केली जात आहे.
कारागृहात राहणारे अनेक कैदी आतमधील वातावरणामुळे वेगळ्या 'मोड'मध्ये जात असतात. आतमधील रुक्षतेचा अनेकांच्या मानसिकतेवर वेगळा परिणाम होतो. कुटुंबियांची खैरखबर मिळत नाही. खूप आठवण येत असली तरी त्यांच्याशी बोलण्या-भेटण्याची मुभा नसते. त्यामुळे कैदी खिन्न होतात. दुसरीकडे गुन्हा करणाऱ्या कैद्यांच्या नातेवाईकांनाही (पत्नी, पती, मुले) दोष नसताना नाहक गुन्हेगार नातेवाईकांपासून दुरावण्याची शिक्षा मिळते. परिणामी कैदी मनोरुग्ण किंवा हिंसक बनण्याची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी एका पाहणीतून तसा अहवालही देण्यात आला होता. हे सर्व लक्षात घेऊन राज्याचे तत्कालीन कारागृह प्रमूख, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी २०१६ ला राज्यातील कारागृहात 'गळाभेट' नावाने एक अभिनव उपक्रम सुरू केला होता. त्यानुसार, बंदीस्त असलेल्या कैद्यांच्या कुटुंबातील १६ वर्षांखालील मुला-मुलींना किंवा नातवंडांना भेटण्याची मुभा या उपक्रमातून देण्यात आली होती. आपल्या मुला-मुलीला, नातू-नातीला भेटण्याची, त्यांच्यासोबत तास-दोन-तास खेळण्याची संधी या उपक्रमातून मिळाल्यामुळे कैद्यांच्या वर्तनात कमालीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा हा कार्यक्रम राज्यातील कारागृहात आयोजित करण्यात येऊ लागला. दरवर्षी १ सप्टेंबरला कारागृह ध्वज दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून यावर्षी येथील मध्यवर्ती कारागृहात गळाभेटचा कार्यक्रम १ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी कैद्यांच्या नातेवाईकांना पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, १०० पेक्षा जास्त कैद्यांची मुलं-मुली, काहींचे नातू किंवा नातीन 'गळाभेट'साठी कारागृहात दाखल होण्याची शक्यता आहे. ही सर्व चिमुकली आपल्या वडिल, आई, आजोबा किंवा आजीसोबत गुजगोष्टी करतील, त्यांच्या अंगखांद्यावर खेळू शकणार आहे.
तर, पत्नी किंवा पतीलाही मुभा
कैद्यांना कारागृहात रोज जेवण (आहार) दिले जाते, त्याला भत्ता म्हणतात. गळाभेटच्या निमित्ताने १ सप्टेंबरला मात्र पुरी-भाजी, मसाला राईस आणि हलवा अशा खमंग जेवणाचा पाहुणाचार सर्वांना दिले जाणार आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत असल्याचे कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी लोकमतला सांगितले. ज्या कैद्यांची मुलं दोन वर्षांपेक्षा कमी वयांची आहेत, अशांची आई (वडील कैदी असेल तर) किंवा वडील (आई कैदी असेल तर) मुलांना घेऊन आतमध्ये जाऊ शकतील.