चितळाची शिकार, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:10+5:302021-05-05T04:12:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील खातखेडा (ता. भिवापूर) शिवारात चितळाची शिकार केल्याची घटना नुकतीच घडली असून, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील खातखेडा (ता. भिवापूर) शिवारात चितळाची शिकार केल्याची घटना नुकतीच घडली असून, यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चितळाचे मांस, शस्त्र व दाेन माेटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यातील दाेन आराेपी पसार असल्याने त्यांचा शाेध सुरू आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैष्णवी झरे यांनी दिली.
प्रदीप कैलास मैसकर, रा. खातखेडा, ता. भिवापूर, गुड्डू सीताराम भरडे व शुभम अरुण कोडापे, दाेघेही रा. नांद, ता. भिवापूर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे असून, पळून गेलेल्या आराेपींची नावे कळू शकली नाहीत. खातखेडा शिवारात वन्य प्राण्याची शिकार करण्यात आल्याची माहिती रविवारी (दि. २) रात्री वनकर्मचाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री या भागात पाहणी करून सापळा रचला.
दरम्यान, या पथकाला प्रदीप मैसकर याच्या शेतात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यातच दाेघे माेटारसायकलवर जात असल्याचे निदर्शनास येताच पाळत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दाेघांना मध्येच अडवून ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडे चितळाचे मांस आढळून आले. प्रदीप कर्मचाऱ्यांच्या हाती लागला असून, अन्य दाेघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. अटक करण्यात आलेल्या आराेपींकडून चितळाचे मांस, शस्त्र व दाेन माेटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी वनविभागाने वनकायद्यान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला, सहायक वनसंरक्षक जी.एन. चांदेकर यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी वैष्णवी झरे, वनपाल वाय.एन. युवनाते, डी.एस. वावरे, टी.पी. श्रीरामे, एस.आर. पेंदाम, एम. एम. निनावे, एस. आर. तांबे, पी. एम. अल्लीवार यांच्या पथकाने केली.
...
वनकाेठडी मिळवणार
अटक करण्यात आलेल्या आराेपींकडून पसार आराेपींबाबत विचारपूस केली जात असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल. या आराेपींना मंगळवारी (दि. ४) भिवापूर येथील न्यायालयात हजर करून त्यांची वनकाेठडी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैष्णवी झरे यांनी दिली. आराेपींनी मांसाची विक्री करण्यासाठी चितळाची शिकार केली. त्यांच्याकडे चितळाचे डाेके, पाय व मांस आढळून आले. या भागात वन्यप्राण्यांची माेठ्या प्रमाणात शिकार करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.