कुत्र्यांच्या तावडीतून चितळाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:42+5:302021-03-08T04:09:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : जोगीठाणा पेठेतील दाट वस्तीत रविवारी (दि. ७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक एक चितळ ...

Chital's release from the clutches of dogs | कुत्र्यांच्या तावडीतून चितळाची सुटका

कुत्र्यांच्या तावडीतून चितळाची सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : जोगीठाणा पेठेतील दाट वस्तीत रविवारी (दि. ७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक एक चितळ आढळून आले. अशातच ८ ते १० गावठी कुत्र्यांच्या तावडीत हे चितळ अडकले. चितळावर कुत्रे तुटून पडल्याने परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने गोळा झाले. अशातच काही वन्यप्रेमींनी तातडीने दखल घेत कुत्र्यांच्या तावडीतून चितळाची सुखरूप सुटका केली. साधारणत: अर्धा तास कुत्र्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता.

रविवारी सकाळच्या सुमारास चितळ दिसताच कुत्र्यांनी पाठलाग केला. चितळामागे कुत्री सैरावैरा पळायला लागली. चवताळलेल्या या कुत्र्यांनी चितळाच्या मानेवर आणि पाठीवर चावा घेत जखमी केले. लागलीच प्रसंगावधान राखत वन्यजीवप्रेमी विनोद पिल्लेवान, विनोद कारू, राज बावनकुळे, उमेश कामठे, उज्ज्वल सिर्सीकर, पीयूष सिर्सीकर, आर्यन मेश्राम आदींनी धाव घेत चितळाचे प्राण वाचविले. जखमी अवस्थेत असलेल्या चितळाला दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील कार्यालयात नेण्यात आले. याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी वैष्णवी झरे यांनी वेळीच दखल घेतली. प्रथमोपचार केल्यानंतर त्यास नागपूरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना करण्यात आले.

...

उपचार केंद्राची गरज

उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्य शहरापासून केवळ ८ किमी. अंतरावर आहे. शिवाय, उमरेड तालुक्याचा परिसर सभोवताल जंगलांनी वेढलेला आहे. अशावेळी अनेक ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल आणि अन्य वन्यप्राणी शहरालगतच्या परिसरात आढळून येत असतात. एखाद्या जखमी वन्यप्राण्यावर उपचार करावयाचे असल्यास प्रक्रियेतच वेळ जातो. अशावेळी उमरेड येथे जखमी वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार होण्यासाठी उपचार केंद्राची गरज असल्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

.....

वन्यजीवप्रेमींनी वेळीच दखल घेत उत्तम कार्य केले. अशाप्रकारे आपआपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडल्यास नक्कीच वन्यजीवांचा हकनाक बळी जाणार नाही. जखमी झालेल्या चितळाचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षाचे असून, जंगल परिसरातून भटकंती करीत ते शहरामध्ये आले असण्याची संभावना आहे.

- वैष्णवी झरे, वनपरिक्षेत्राधिकारी, दक्षिण-उमरेड वनपरिक्षेत्र.

Web Title: Chital's release from the clutches of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.