पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही"
By कमलेश वानखेडे | Published: August 6, 2022 02:09 PM2022-08-06T14:09:39+5:302022-08-06T14:16:16+5:30
चित्रा वाघ यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला
नागपूर : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओ ट्विट केला होता. यावर तुम्ही फॉलोअप घेतला का, असे पत्रकारांनी चित्रा वाघ यांना विचारले असता "मी बॅकफूटवर येण्याचा प्रश्नच नाही, नाना पटोले स्वतः बोलले की मी न्यायालयात जाणार आहे, तर त्यांनी जावं..." अशी प्रतिक्रिया दिली.
मंत्रालयात कोणतेही काम अडलेले नाही
राज्यात जम्बो मंत्रिमंडळ नसले तरी कुठलेही काम रखडलेले नाही. मंत्रालयात कामे करून घेण्यासाठी उलट नागरिकांची गर्दी वाढली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्देश देऊन त्यांचे प्रश्न सोडवत आहेत.मंत्रालयात काम थांबलेले नाही. अतिवृष्टी झाली तेव्हा दोनही मंत्र्यानी बांधावर जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे
भंडारा येथे ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या पाशवी अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण पिडीतिने डॉक्टरांकडे सांगितलेल्या माहितीनुसार यात चार आरोपी आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्वरित चौथ्या आरोपीचा शोध घ्यावा व या चारही आरोपींना अत्यंत कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.
गेल्या अडीच वर्षात राज्यात बलात्काराच्या अशा घटना घडल्या की त्या फास्टट्रॅक कोर्टात चालवू, असे सरकारकडून सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात राज्यात फास्टट्रॅक कोर्ट नाही. त्यामुळे अशा सर्व केसेस निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे, अशी मागणी आपण भाजप शिवसेनेच्या युती सरकारकडे करणार असून त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल, असा दावाही चित्रा वाघ यांनी केला.