एसटीच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणार चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:06 AM2019-08-12T11:06:14+5:302019-08-12T11:06:49+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ७१ वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना अहोरात्र सेवा देत आहे. महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे.
‘वारी लाल परीची’ या चित्ररथातील प्रदर्शनाद्वारे गाव तेथे एसटी, हात दाखवा एसटी थांबवा यापासून ते मानव विकास योजनेपर्यंतची माहिती नागरिकांना मिळणार आहे. एसटीच्या सुरुवातीच्या काळापासून ते शिवशाही महामंडळात दाखल होईपर्यंतचा इतिहास पहावयास मिळणार आहे. राज्यातील ५० प्रमुख बसस्थानकावर हा चित्ररथ एक दिवस थांबणार आहे. नागपुरात १३ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हा चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. चित्ररथाचे उद्घाटन एसटीचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्या हस्ते सकाळी १० वाजता गणेशपेठ स्थानकावर होईल. जिल्ह्यातील सर्व शाळा संचालकांनी विद्यार्थ्यांना चित्ररथ दाखविण्यासाठी घेऊन यावे, असे आवाहन विभाग नियंत्रक अशोक वरठे यांनी केले आहे.