कोराडी वीज केंद्रात क्लोरिन वायुगळती
By admin | Published: April 9, 2015 02:56 AM2015-04-09T02:56:45+5:302015-04-09T02:56:45+5:30
औष्णिक वीज केंद्राच्या पाणी तपासणी विभागात क्लोरिन वायूच्या सिलिंडरमधून गळती होऊन १५ कामगार बेशुद्ध झाले.
कोराडी : औष्णिक वीज केंद्राच्या पाणी तपासणी विभागात क्लोरिन वायूच्या सिलिंडरमधून गळती होऊन १५ कामगार बेशुद्ध झाले. वायुगळतीची ही घटना बुधवारी सायंकाळी ६.१८ वाजताच्या सुमारास घडली. बेशुद्ध झालेल्यांमध्ये महानिर्मिती आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. सर्वच कामगारांना रुग्णवाहिकेने महानिर्मितीचे रुग्णालय आणि त्यानंतर नागपुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दिलीप उके, राहुल साकरे, राजेश दरेकर, शारदा ठाकरे, ए.आर. कान्हेरे, अश्विन मानवटकर, जयप्रकाश मानवटकर, सदानंद दापोरकर, पी.आर. भोसले, प्रेमचंद गोडबोले, आर.एस. महल्ले, व्ही.टी. रूपनाथ, प्रेमचंद गोडबोले, महेंद्र खेडीकर, राजाराम रतनपुरे यांचा बेशुद्ध झालेल्यांमध्ये समावेश आहे.
कोराडी येथील औष्णिक वीज केंद्रातील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट येथून पाणी शुद्धीकरण करून स्थानिक प्रकल्प तसेच विद्युत वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. यासाठी क्लोरिनचा उपयोग केला जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाण्याच्या टाकीमध्ये क्लोरिन मिश्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, क्लोरिन वायूच्या सिलिंडरमधून वायुगळती सुरू झाली. त्यामुळे काही हालचाली करण्यापूर्वीच एक एक असे १५ कामगार बेशुद्ध झाले.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाचे सतीश शिंदे, योगेश ठाकूर, संतोष कुचर यांनी त्यांना बाहेर काढले. बेशुद्ध कामगारांना तत्काळ औष्णिक विद्युत केंद्राच्या रुग्णालयात हलविले. तेथे डॉ. ए.एस. कासटवार, कर्मचारी व्ही.एच. भगत, शंकर चेलानी यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामगारांना नागपूरला हलविण्याची सूचना केली. त्यावरून सर्व कामगारांना नागपूरच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेमुळे कोराडी वीज केंद्रात खळबळ उडाली होती. रात्री उशिरापर्यंत कामगारांचे नातेवाईक महानिर्मितीच्या रुग्णालयात येऊन तेथून कुणाल हॉस्पिटलमध्ये गेले. (वार्ताहर)