‘चॉईस बेस क्रेडिट’ प्रणाली यंदापासून

By Admin | Published: March 17, 2015 01:50 AM2015-03-17T01:50:28+5:302015-03-17T01:50:28+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात येत्या शैक्षणिक सत्रापासून ‘सीबीएस’ (चॉईस बेस क्रेडिट)

Choice base credit system | ‘चॉईस बेस क्रेडिट’ प्रणाली यंदापासून

‘चॉईस बेस क्रेडिट’ प्रणाली यंदापासून

googlenewsNext

नागपूर विद्यापीठ : आराखडा ठरविण्यासाठी बैठकांवर जोर
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात येत्या शैक्षणिक सत्रापासून ‘सीबीएस’ (चॉईस बेस क्रेडिट) प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी बैठका सुरू आहेत. सोमवारी सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठातांची बैठक घेण्यात आली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागावरील एकूण ताण लक्षात घेता यावर्षी केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमांतच ही प्रणाली लागू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठांना आगामी शैक्षणिक सत्रापासून ‘सीबीएस’ प्रणाली लागू करण्याचा आग्रह केला आहे. देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये येत्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून समान निकषांवर मूल्यमापन होणार असून ‘सीबीएस’च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. या मुद्यावर फेब्रुवारी महिन्यात मुंबईत झालेल्या कुलगुरू परिषेदेत सखोल चर्चा झाली व सर्व विद्यापीठांनी यादृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना देण्यात आल्या.
नागपूर विद्यापीठानेदेखील या बाबतीत प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी या मुद्यावर सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांची बैठक झाली. विद्यापीठात सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यात आली आहे. विद्यापीठावर येणारा एकूण ताण लक्षात घेता सद्यस्थितीत केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमांनाच ‘सीबीएस’ प्रणाली लागू करता येणे शक्य आहे, २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून पदवी अभ्यासक्रमांनादेखील ही प्रणाली लागू करता येईल े असे मत यावेळी अधिष्ठात्यांनी मांडले. यादृष्टीने सर्वात अगोदर विज्ञान शाखेच्या आराखड्याचे प्रारूप तयार करण्यात येईल. त्यावर विस्तृत चर्चा होऊन मग इतर शाखांसाठी आराखडा ठरविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
ही प्रणाली राबविण्यासाठी महाविद्यालयात पुरेसे शिक्षक व प्राचार्यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. याशिवाय नव्याने अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे असते. (प्रतिनिधी)

अशी आहे ‘सीबीएस’ प्रणाली
‘सीबीएस’ प्रणालीमध्ये ‘कोअर’, ‘इलेक्टिव्ह’ व ‘फाऊंडेशन’ असे अभ्यासक्रमांचे तीन प्रकार असतील. ‘कोअर’ अभ्यासक्रम प्रत्येक ‘सेमिस्टर’ला लागू असेल व यात अत्यावश्यक विषयांचा समावेश होईल. ‘इलेक्टिव्ह’ अभ्यासक्रमात विस्तारित किंवा नवीन शाखेच्या विषयांचा समावेश होऊ शकतो. ‘फाऊंडेशन’ अभ्यासक्रमाचे ‘इलेक्टिव्ह’ किंवा ‘कंपल्सरी’ असे दोन प्रकार होऊ शकतात. ‘सीबीएस’ प्रणालीनुसार एखादा अभ्यासक्रम करताना त्याचबरोबर दुसऱ्या शाखेतील एखादा विषय घेता येणे शक्य आहे. यातील अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्ननुसार असून त्या विषयाचे क्रेडिट घेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य होते. यात विद्यार्थ्याचे वर्षभराचे मूल्यमापन करण्यात येईल. अभ्यासक्रमात स्टडीपेपर, भरपूर प्रात्यक्षिके, सेमिनार, कार्यशाळा, असाईनमेंटचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Choice base credit system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.