चोपरा,गेडाम, मिश्रा आदींचा भाजपात प्रवेश
By admin | Published: June 28, 2017 02:56 AM2017-06-28T02:56:47+5:302017-06-28T02:56:47+5:30
काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ममता गेडाम, माजी नगरसेवक संजय मोहोड,
काँग्रेसला धक्का : पक्षांतर्गत वादातून काँग्रेसला रामराम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ममता गेडाम, माजी नगरसेवक संजय मोहोड, सुमन मिश्रा, डॉ. प्रकाश रणदिवे, रामेश्वर खडसे यांच्यासह २५० कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
काँगे्रस शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून हा वाद उफाळून आला होता. यामुळे अनेक प्रभागात बंडखोरी झाली होती. याचा फटका निवडणुकीत बसला. काँग्रेसचे जेमतेम २९ उमेदवार निवडून आले. पक्षाच्या नगरसेवकांचे दोन गट पडल्याने महापालिकेतील गटनेतेपदाचा वाद न्यायालयात गेला आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांतील वाद शमण्याची चिन्हे नसल्याने काँग्रेसला गळती लागल्याची चर्चा आहे.
काँग्रेसने तुमच्यावर अन्याय केला. मात्र भाजपात तुमच्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. या प्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, विकास कुंभारे, कार्यविस्तार अभियानाचे प्रमुख जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.
प्रभाग १० मधून डॉ. प्रशांत चोपरा यांच्या पत्नी गार्गी चोपरा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. परंतु या निवडणुकीत याच प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालबन्सी यांना त्यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती. यावरून चोपरा व ग्वालबन्सी यांच्यात वाद झाला होता. या वादातून गार्गी चोपरा यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्याने त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.
ममता गेडाम माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या समर्थक समजल्या जातात. गेडाम यांनी आपल्या समर्थकासह भाजपात प्रवेश केल्याने उत्तर नागपुरातही काँग्रेसला खिंडार पडले आहे.
भाजपात प्रवेश करणारे कार्यकर्ते काँग्रेसमधील विविध गटाचे असल्याने सर्वच गटांना हा धोक्याचा इशारा आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेसमधील गटबाजीमुळे कार्यकर्ते व पदाधिकारी त्रस्त आहेत. गटबाजीमुळे पक्षात आपल्याला राजकीय भवितव्य नसल्याने अनेक कार्यकर्ते भाजपाची वाट धरत आहेत.