देशभक्तीपर गीतांची स्वरसंध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:03+5:302021-02-05T04:41:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात देशभक्तीपर गीतांची ‘स्वरसंध्या’ या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या परिसरात देशभक्तीपर गीतांची ‘स्वरसंध्या’ या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विविध देशभक्तीपर गीतांना विद्यापीठाचा संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला हाेता. संजय मेश्राम व संदेश मेश्राम या पिता-पुत्राच्या जोडीने सादर केलेल्या सुरेल देशभक्ती गीतांनी श्राेते मंत्रमुग्ध झाले हाेते.
विद्यापीठात अलीकडेच तयार केलेल्या खुल्या रंगमंचावर सादर झालेला हा पहिलाच कार्यक्रम होता. कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी उद्घाटनपर भाषणात रामटेककर कलावंतांसाठी हा खुला रंगमंच विनामूल्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. विद्यापीठाचा खुला रंगमंच 'चंद्रशाला' येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या भरतमुनी ललितकला केंद्राच्यावतीने देशभक्ती गीतांची स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे अर्थविभाग प्रमुख रामचंद्र जोशी, ललित कला केंद्राच्या संचालिका ललिता चंद्रात्रे उपस्थित होत्या. संजय आणि संदेश मेश्राम या पिता-पुत्राच्या जोडीने सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संजय यांनी हिंदी व मराठीतील काही राखणीतील गझलदेखील रसिकांच्या आग्रहास्तव सादर केल्या. ‘जिंदगी मौत ना बन जाये, संभालो यारो’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या वेदश्री बारोकर हिचे काव्यमय निवेदन लक्षवेधक ठरले. रितेश कुमरे यानेही तिला समर्थपणे साथ दिली. तबल्यावर शाम रंगिले यांनी तर की बोर्डवर शिवम कुरील यांनी उत्कृष्टपणे साथ दिली. निखिल नागेश्वर यांनी ध्वनिव्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाला डॉ. निनाद पाठक, डॉ. गौरी पाठक, दीपक चिंचखेडे, प्रा. डॉ. अविनाश श्रीखंडे, प्राचार्य दीपक गिरधर, उमा काठीकर, महेश सावंत यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच रसिक नागरिकांनी माेठ्या संख्येने हजेरी लावली हाेती.