नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:46 AM2018-12-25T00:46:18+5:302018-12-25T00:53:58+5:30
शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे.
चर्चमध्ये कॅरोल गाणे निनादू लागली आहेत. एलआयसी चौकातील एसएफएस चर्च लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथील चर्चला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. सोमवारी रात्री १० वाजता ख्रिश्चन समाजबांधव चर्चमध्ये एकत्र आले. रात्री ११ वाजता युवकांनी कॅरोल गीत सादर केले. चर्चचे फादर अल्बर्ट डिसूझा यांच्या नेतृत्वात पवित्र मिस्सा पूजा करण्यात आली. रात्री १२ वाजता केक कापण्यात आला. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लोकांनी प्रतिकात्मक गोशाळेत प्रभू येशूला पाळण्यात झुलवले. शहरात इतर चर्चमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण होते. युवकांनी ‘सांताक्लॉज’ची वेशभूषा धारण केली होती.
त्याचप्रकारे सेमिनही हिल्स येथील ऑल सेन्स रोजरी चर्चही आकर्षण रोषणाईने सजविण्यात आले. चर्च परिसरात दोन आकर्षण गोशाला साकारण्यात आली. चर्चचे फादर इवान रॉड्रिक्सच्या नेतृत्वात सोमवारी रात्री लुर्दमाता मंदिरात पूजा करण्यात आली. चर्चमध्ये येशूचा जन्म दिवस रात्री साजरा करण्यात आला. रात्री १२ वाजताच केक कापण्यात आला.
ख्रिसमसची विशेष तयारी
शहरातील सदर, मोहननगर, मरियमनगर, न्यू कॉलनी, नई बस्ती, मेकोसाबाग, गड्डीगोदाम, खलासी लाइन, मार्टिननगर, जरीपटका, चंदननगर, अजनी आदींसह अनेक वस्त्यांमध्ये गिटार आणि पियानोच्या संगीतावर ‘जिंगल बेल’ आणि विश यू मॅरी ख्रिसमस सारखे कॅरोल गीत सादर करण्यात आले. सजावटीच्या वस्ती आणि गिफ्ट खरेदीसाठी सोमवारी रात्री बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. ख्रिसमस ट्री, गोल्डन घंटी, लॅम्प, ग्रीटिंग कार्ड, सांताक्लॉजच्या टोप्या, कपडे, चॉकलेट बॉक्स, ड्रम आदी वस्तू खदेदीवर जोर होता.