एका गुन्ह्यात अटक झालेल्या ‘चुहा’ने दिली तीन गुन्ह्यांची कबुली
By दयानंद पाईकराव | Published: May 22, 2024 09:00 PM2024-05-22T21:00:41+5:302024-05-22T21:00:55+5:30
तीन दुचाकी जप्त : पाचपावली पोलीसांची कामगिरी
नागपूर : वाहनचोरीच्या एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने एक नव्हे तर तब्बल तीन दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहम्मद इमरान उर्फ चुहा मोहम्मद असलम अंसारी (२३, रा. अंसारनगर, डोबीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १५ मे २०२४ रोजी गुरुदयाल भय्यालाल चौधरी (५५, रा. रमाईनगर कपिलनगर) यांनी कमाल टॉकीजच्या बाजुला आपली दुचाकी उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पाचपावली ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपी चुहाला ताब्यात घेतले असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी व लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ९५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीच्या ताब्यातून १ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या तीन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.