चक्क राज्यमंत्र्यांनाच मुंबईला जाण्यापासून रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:21+5:302020-12-23T04:07:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी चक्क कडू यांना विश्रामगृहातच रोखून ठेवले. त्यामुळे त्यांचे मुंबईचे विमान हुकले. या प्रकारामुळे कडू काही काळ संतप्त झाले होते. बच्चू कडू मंत्रिपदावर आल्यानंतरदेखील त्यांचा आंदोलनाचा सोस गेलेला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाच सोस पटला नसल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहे. दरम्यान, त्यांना अडविण्याचे आदेश कुणी दिले, यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले होते.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बच्चू कडू सकाळी ९.१५ च्या विमानाने मुंबईला रवाना होणार होते. सिंचन विभागाच्या विश्रामगृहाबाहेर तैनात पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे काही वेळ तणावदेखील निर्माण झाला होता. अखेर दुपारच्या विमानाने जाण्याची त्यांना परवानगी मिळाली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे हे त्यांना घ्यायला आले होते. मात्र पुण्याला जायच्या अटीवरच त्यांना नागपुरातून जाण्याची परवानगी मिळाली, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. शासनाचा गैरसमज झाला होता, अशी माहिती कळाली. मात्र नेमके का थांबविले हे समजले नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असतानादेखील कडू यांना अशाप्रकारे का रोखले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंदोलन करायचे असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या : आंबेडकर
मंत्र्यांनी आंदोलनाची भाषा करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान राखले पाहिजे. मंत्र्यांना असे बेशिस्त वागता येत नाही व त्यांना आंदोलनाचा अधिकारदेखील नाही. माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता. मंत्र्यांनी अगोदर स्वत:ची भूमिका व बंधने स्पष्ट करून घ्यावी. एकतर मंत्रिपदावर राहावे किंवा रस्त्यावर येऊन आंदोलन करावे. कडू यांची भूमिका चुकली आहे, या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.