तालुक्यात चुरशीच्या लढती, पण मतदान शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:03+5:302021-01-16T04:13:03+5:30
तालुक्यात सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ४५.७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. दुपारी ३.३० पर्यंत ही आकडेवारी ६७.२१ ...
तालुक्यात सकाळी ७.३० ते १.३० वाजेपर्यंत ४५.७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. दुपारी ३.३० पर्यंत ही आकडेवारी ६७.२१ टक्के होती. एकूण तिन्ही ग्रा.पं.त ३७१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. यात १८२६ पुरुष, तर १८८४ महिला मतदारांचा समावेश होता. पुल्लर, मोखाबर्डी, आलेसुर या तीन ग्रामपंचायतीत प्रत्येकी ३ वाॅर्डातील प्रत्येकी ९ जागा, अशा एकूण २७ जागांवर ७३ उमेदवार रिंगणात होते. सकाळी १० मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. ग्रामीण भागात शेतकरी व मजूरवर्गाची संख्या अधिक असल्यामुळे शिवाय शुक्रवार हा तालुक्याचा आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे अनेकांनी गावाबाहेर पडण्यापूर्वी सकाळीच मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ नंतर मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी होती. मतदार यादीतील कुणाचे मतदान शिल्लक राहिले का, याची चाचपणी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून सुरू होती.
निवडणूक अधिकारी तहसीलदार अनिरुध्द कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड, ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह कर्मचारी निवडणुकीवर लक्ष ठेवून होते.
_________________
शहरातूनही आले मतदार
गावखेड्यातील अनेकजण नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचे मतदान मूळ गावात आहे. त्यामुळे उमेदवारांनी शहरात वास्तव्यास असलेल्या अशा मतदारांना मतदानासाठी साकडे घातले. काहींनी तर मतदारांच्या येण्या-जाण्याचीही व्यवस्था केली.