च्यवनप्राशवरून जि.प. सभापती व सदस्यांत रंगला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:27+5:302021-09-19T04:08:27+5:30
नागपूर : जि.प.च्या महिला व बाल कल्याण समितीत सभापती व सदस्यांमध्ये च्यवनप्राश खरेदीवरून चांगलाच वाद रंगला आहे. सभापतीचे ...
नागपूर : जि.प.च्या महिला व बाल कल्याण समितीत सभापती व सदस्यांमध्ये च्यवनप्राश खरेदीवरून चांगलाच वाद रंगला आहे. सभापतीचे म्हणणे आहे प्रसिद्धीसाठी सदस्य खोटेनाटे आरोप करीत आहे. तर सदस्याचे म्हणणे आहे की सभापती समितीची दिशाभूल करीत आहेत.
महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती उज्ज्वला बोढारे यांनी गेल्या आठवड्यात च्यवनप्राश खरेदी प्रकरणात समिती सदस्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप सदस्य राधा अग्रवाल यांनी केला होता. सदस्याचे हे आरोप सभापतींनी प्रसिद्धी माध्यमापुढे खोडून काढले. सभापती म्हणाल्या की, विभागाला १ कोटीचा निधी मंजूर असून, त्यात ५० लाखांचे च्यवनप्राश व ५० लाखांच्या सॅनिटरी नॅपकीन घेण्याची योजना आहे. १६ जून रोजीच्या विषय समितीच्या बैठकीत विषयाला मंजुरी प्राप्त झाली. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, विषय पुढच्या प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे; पण समितीच्या सदस्य राधा अग्रवाल या चुकीची माहिती देऊन अध्यक्ष व सभापतींमध्ये भांडण लावून प्रसिद्धी मिळवित आहेत. सभापतीने केलेल्या आरोपांवर राधा अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, सभापतीच दिशाभूल करीत आहेत. त्यांनी सभापतीला सर्व सदस्यांसमोर ‘दूध का दूध पाणी का पाणी’ करण्याचे खुले आव्हानच दिले. जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक तोंडावर असताना च्यवनप्राशवरून ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापले आहे.
- अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून मनाप्रमाणे निर्णय घेतात सभापती
कोरोना काळापासून ऑनलाइन बैठका सुरू आहेत; मात्र सदस्यांना बैठकीचे इतिवृत्त देण्याची तसदी विभागाकडून होत नाही. विभागाला तशा सूचना सभापतीने दिल्या का? सभापतींना मनमानी करायची असेल तर बैठकांचे सोपस्कार कशाला पार पाडता. अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावून मनाप्रमाणे निर्णय घेण्यासाठी का? असा घणाघात राधा अग्रवाल यांनी केला. बैठकीपूर्वी इतिवृत्त मिळणे आमचा हक्क आहे. विभागाने आमचा हक्क हिरावला आहे.