दिव्यांग व्यक्तीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:06+5:302021-07-09T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पारडी परिसरात मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी परिसरात मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी व दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आ.कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
पोलिसांच्या निर्दयतेमुळे मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला अक्षरश: गुन्हेगारासारखी वागणूक दिली. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुठे गेले तसेच हे प्रकरण वरिष्ठ पातळीहून दाबण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला.
पोलीस विभागाच्या सहायता निधीतून पीडित कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणीदेखील खोपडे यांनी केली. वाहतूक पोलीस चौक सोडून दुसरीकडेच वसुली करताना आढळून येतात. विशेषत: डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग, प्रजापतीनगर या भागात तर असे प्रकार जास्त दिसतात. पारडीच्या घटनेनंतर आतातरी अशा प्रकारची वसुली थांबविणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्तांनी स्वत: दखल घेऊन वाहतूक पोलिसांव्दारे होत असलेली सक्तीची वसुली थांबवावी, असेदेखील खोपडे म्हणाले.