लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:20 PM2020-06-18T20:20:20+5:302020-06-18T20:23:51+5:30
मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिकांचेही जगणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिकांचेही जगणे कठीण झाले आहे.
नागपूर शहरात १३ मार्चपासून सर्व चित्रपटगृहे बंद आहेत. शहरात ‘सिंगल स्क्रीन’सह ‘मल्टिप्लेक्स’, अत्याधुनिक व व्यावसायिक चित्रपटगृहे शहरात आहेत. या सर्व चित्रपटगृहांचा दरमहा व्यवसाय सरासरी अडीच ते ३ कोटी रुपयांच्या जवळपास असतो. या हिशेबाने मागील तीन महिन्यात साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
चित्रपट व्यवसायातून तसेच मनोरंजन करातून सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारा महसूलही या लॉकडाऊनच्या दिवसात ठप्प पडला आहे. एकूण व्यवसायाच्या १२ टक्के जीएसटी सरकारच्या तिजोरीमध्ये जात असते. मागील तीन महिन्यांपासून व्यवसाय नसल्याने हे थांबले आहे. विदर्भ, मध्यप्रदेश या भागासाठी सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन कार्यरत आहे. या माध्यमातून चित्रपट व्यावसायिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचविले आहेत. मात्र शासनाच्या निर्णयानुसार आता पुढील आदेशाची वाट पाहावीच लागणार असल्याचे मत एका चित्रपटगृह संचालकाने व्यक्त केले.
शेकडोंवर लॉकडाऊनची कुऱ्हाड
एका चित्रपटगृहामध्ये सरासरी १५ ते २० कर्मचारी कार्यरत असतात. या परिसरात अनेक फेरीवाले आपला व्यवसाय करतात. चहा, नाश्ता, शेंगदाणे, हातठेले अशा अनेक व्यावसायिकांची उपजीविका या व्यवसायावर असते. चित्रपटगृहात असलेल्या कॅन्टिनचाही व्यवसाय बराच मोठा असतो. नागपूर शहरातील सर्व चित्रपटगृहांची परिस्थिती लक्षात घेतली तर शेकडोंना बेरोजगार व्हावे लागले आहे.
खर्च सुरुच
परिस्थिती बिकट आहे. व्यवसाय बंद असला तरी खर्च सुरूच आहे. विजेसंदर्भात सरकारने काही प्रमाणात सूट दिली असली तरी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्च सुरूच आहे. ही परिस्थिती पुन्हा किती दिवस राहील याचा अंदाज नाही. चित्रपटगृहे सुरू झाल्यावरही पुढचे काही महिनेतरी प्रेक्षकांची गर्दी कमीच राहणार आहे.
प्रमोदकुमार मुनोत, चित्रपटगृह संचालक