विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:02 PM2020-12-17T13:02:11+5:302020-12-17T13:02:31+5:30
Nagpur News वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भावर निसर्गाचा वरदहस्त आहे. घनदाट जंगले, प्राणी आणि त्यात असलेल्या वृक्षांच्या विविध प्रजाती हे येथील वैशिष्ट्य आहे. यातून विदर्भातील पर्यटन वाढविण्यासाठी योजना आखल्या गेल्या. वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट तयार करण्याची घोषणाही झाली. मात्र सध्यातरी हे सर्व कागदावरच आहे.
८ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भातील निसर्ग आणि वन पर्यटनाला महाराष्ट्रात असलेला वाव लक्षात घेता याचे मुख्यालयही नागपुरातच ठेवण्यात आले. विदर्भात असलेल्या सामाजिक वनीकरणाच्या १८ प्रकल्पांसह एकूण ८८ प्रकल्पांच्या विकासाचा प्रस्ताव चार वर्षापूर्वी तयार करण्यात आला. त्यासाठी काही प्रमाणात निधीही मिळाला असून काम सुरू आहे.
निसर्ग पर्यटनाला वाव मिळावा यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाने विदर्भातील निसर्ग पर्यटन स्थळांचे सर्किट तयार करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या क्षेत्रांसह मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, कऱ्हांडला, टिपेश्वर अभयारण्य आदींचा समावेश करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात केवळ घोषणेपलीकडे यात काहीच झाले नाही. या संदर्भात अधिक महिती घेतली असता, एमटीडीसी (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ)च्या सहकार्याने विदर्भातील निसर्ग पर्यटनाचे सर्किट आखले जाणार होते. मात्र अद्याप यासाठी मुहूर्तच निघालेला नाही.
कसा होणार पर्यटनाचा विकास?
विदर्भात पर्यटक आल्यावर त्याच्या डोळ्यापुढे फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच असतो. दोन दिवसात पर्यटक विदर्भातून माघारी निघतो. मात्र येथील साधनसंपत्तीचा योग्य उपयोग आणि नियोजन केले तर निसर्ग आणि वन पर्यटनाला बराच वाव आहे. पर्यटक आल्यावर किमान आठवडाभर तरी तो विदर्भातच स्थिरावेल असे सर्किट तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ वनविभागावरच अवलंबून न राहता पर्यटन विकास मंडळ, वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व विभाग यांची संयुक्त आखणी होण्याची गरज आहे. सध्यातरी विदर्भातील पर्यटन केवळ वाघांभोवतीच फिरत असल्याने हा विषय एका अंगाने चालला आहे.
...