जरीपटका ठाण्याला घेराव

By admin | Published: March 18, 2016 03:10 AM2016-03-18T03:10:16+5:302016-03-18T03:10:16+5:30

बाबादीप सिंग नगरातील गुरुद्वाराचे प्रधान (सरपंच) गुरुविंदरसिंग धिल्लन यांच्याविरुद्ध बनावट तक्रारीवरून गुन्हा दाखल करून ..

Circumstances in the district of the district | जरीपटका ठाण्याला घेराव

जरीपटका ठाण्याला घेराव

Next

गुरुद्वाराच्या प्रधानाविरुद्ध कारवाई : शीख बांधवांमध्ये तीव्र असंतोष
नागपूर : बाबादीप सिंग नगरातील गुरुद्वाराचे प्रधान (सरपंच) गुरुविंदरसिंग धिल्लन यांच्याविरुद्ध बनावट तक्रारीवरून गुन्हा दाखल करून जरीपटका पोलिसांनी अपमानास्पद वर्तन केल्यामुळे शीख समुदायांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, दोनशेवर महिला पुरुषांनी गुरुवारी दुपारी जरीपटका पोलीस ठाण्याला घेराव घातला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरण समजून घेतले.
जरीपटका ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीचा भूखंड अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत होता. त्यामुळे या भूखंडावरून अनेक जण येणे-जाणे करीत होते. काही दिवसांपूर्वीच त्याला भूखंडधारकाने कुंपण केले. त्यामुळे काही जणांच्या जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला. यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरले. दोन गटातील वाद वाढू नये म्हणून गुरुद्वाराचे प्रधान गुरुविंदरसिंग धिल्लन यांनी मध्यस्थी केली. दोन्ही गटाची बाजू समजून घेतल्यानंतर ज्याचा भूखंड आहे, तो त्यावर कुंपण घालू शकतो, असा निर्णय धिल्लन यांनी दिला. त्यामुळे धिल्लन यांच्या विरोधातील मंडळींनी त्यावेळी त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान, ध्यानीमनी नसताना धिल्लन यांना एक नोटीस देऊन पोलिसांनी जरीपटका ठाण्यात बोलवून घेतले. त्यानुसार, गुरुविंदरसिंग बुधवारी दुपारी जरीपटका ठाण्यात पोहचले. काय प्रकरण आहे, हे कळण्यापूर्वीच ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांनी धिल्लन यांच्याशी अपमानास्पद वर्तन करून त्यांना कोठडीत बंद केले. हे वृत्त कळताच मोठ्या प्रमाणावर शीख समुदायातील महिला-पुरुष ठाण्यात पोहचले. त्यांनी धिल्लन यांना कोणत्या गुन्ह्यात अटक केली, त्याची विचारणा केली. तेव्हा ठाणेदार बहादुरे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुषांशी असभ्य भाषेत बोलून त्यांना धक्के मारून बाहेर काढण्याची धमकी दिली. (प्रतिनिधी)

आधी अटक, नंतर तक्रार
विशेष म्हणजे, धिल्लन यांना कोठडीत टाकल्यानंतर संबंधित महिलेची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर या तक्रारीवरून धिल्लन यांना अटक केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर ते बाहेर आले. पोलिसांच्या या अन्यायकारक प्रकारामुळे शीख समुदायात तीव्र असंतोष पसरला. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी रात्री पूजा-अर्चना झाल्यानंतर धिल्लनवर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवला. त्यानंतर गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास जरीपटका ठाण्याला घेराव घातला. ठाणेदार बहादुरे यांनी चंडोक नामक गुन्हेगाराच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची सतप्त जमावाने मागणी केली. ही माहिती कळताच सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली. त्यांनी प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.

पोलीस आयुक्तांशी चर्चा
खोट्या तक्रारीवरून गुरुद्वाराच्या प्रधानावर कारवाई केल्याच्या भावनेने शीख बांधवात कमालीचा रोष होता. त्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास पोलीस आयुक्तालय गाठले. यावेळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करीत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही बैठक चालली. तो पर्यंत शीख समुदायातील १०० ते १५० महिला पुरुष बाहेर उभे होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा नूतनताई रेवतकर आणि अन्य काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही यावेळी हजर होते. त्यातील एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी या संबंधात कुणावरही अन्याय होणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Web Title: Circumstances in the district of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.