नागपुरात किटअभावी सिरो सर्वेक्षण ठप्प : २४०० लोकांची होणार होती तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 09:32 PM2020-08-18T21:32:37+5:302020-08-18T21:33:57+5:30
नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती, जुलै महिन्यापर्यंत सुमारे १२०० लोकांची चाचणी झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, अनेक मोठ्या शहरांमधील या चाचणीचे निष्कर्ष येऊ लागले असताना उपराजधानीतील चाचणीच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत परंतु कोविड होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविड अॅन्डीबॉडीज असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘क्लिनिकल इन्फेक्शन’ म्हणतात, असे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील निवडक लोकांची चाचणी केली जाणार होती. यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुके व महानगरपालिकेच्या १० झोनचा समावेश करण्यात आला होता. मनपा झोन व तालुक्यामधील सामान्य वसाहतीतील १४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. कन्टेन्मेंट झोनमधील ६०० लोकांच्या तर ४०० चाचण्या हायरिस्क लोकांमधून घेतल्या जाणार होत्या. यात कोविड रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, मनपा कर्मचारी, पोलीस व पत्रकारांचा समावेश होता. संपूर्ण चाचण्यांच्या अहवालावरून नागपूर जिल्ह्यात कोविडचा इन्फेक्शनचा दर किती आहे, याचा निष्कर्ष काढला जाणार होता. या चाचणीला जुलै महिन्यात सुरुवात झाली. परंतु दरम्यानच्या काळात तपासणीच्या किटचा तुटवडा पडल्याने सध्या ही चाचणी बंद असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. मात्र या विषयी कुणी अधिकृत बोलण्यास तयार नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने या चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पीएसएम विभागाची होती.