नागरिकांनो गाफिल राहू नका, गर्दी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:15+5:302021-09-06T04:11:15+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आवाहन : लसीकरण करून घ्या, स्वत:ची काळजी घ्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकरांनी कोरोनाची दुसरी लाट ...
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आवाहन : लसीकरण करून घ्या, स्वत:ची काळजी घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांनी कोरोनाची दुसरी लाट चांगलीच अनुभवली आहे. पुन्हा ती परिस्थिती येऊ नये, असे प्रत्येकालाच वाटते. सध्या सर्व व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाला आहे. परंतु वैद्यकीय तज्ज्ञ आणि टास्क फोर्सने देशात पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सर्व स्तरामध्ये अनिश्चिततेचे सावट आहे. हा महिना सण-उत्सवांचा आहे. तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक भयावह असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे, त्यामुळे नागरिकांनो गाफिल राहून चालणार नाही. मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. शक्यतोवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका. आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा आपल्या हाती आहे, याची जाणीव ठेवा, आणि ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी तातडीने करून घ्या, असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहेत.
- मास्क -सॅनिटायझर-सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री आवश्यक
कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही, ही बाब सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असले तरी गाफिल राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आपण अनुभवली आहे. तिसरी लाट येऊ नये म्हणून आपल्यालाच काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मास्क -सॅनिटायझर आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षित अंतर ही त्रिसूत्री आपल्याला कायम ठेवायची आहे. यासोबतच ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी त्वरित लस टोचून घ्यावी. सध्या सणासुदीचे दिवस आहे. त्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दी करू नका, गर्दीत जाणे टाळा.
प्राजक्ता लवंगारे-वर्मा , विभागीय आयुक्त नागपूर
- लोकांनीच आता स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे
काेराेनाचे संकट अजूनही टळलेले नाही. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा याबाबत प्रशासनााच्यावतीने वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु लोक त्याला गंभीरतेने घेताना दिसून येत नाही. नागपूरकरांनी दुसरी लाट चांगलीच अनुभवलेली आहे. ती परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर लोकांनीच आता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. सणासुदीचे दिवस आहे, तेव्हा नाागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. शक्यतोवर गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक गणपती बसवू नये.
विमला आर. , जिल्हाधिकारी
- गर्दी करू नका- लसीकरण करून घ्या
गेल्यावर्षी सण उत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट अचानक आली होती. त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सव आणि महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लोकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कोरोनाच्या संदर्भातील सर्व प्रोटोकॉल पाळावे. सध्या लसीकरणासाठी चांगला स्टॉक उपलब्ध आहे. ज्यांनी पहिला डोज घेतला नाही किंवा ज्यांचा पहिला डोज होऊन ८४ दिवस झाले आहे त्यांनी दुसरा डोज ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन घ्यावा. विशेष म्हणजे बाजारात व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. सामाजिक अंतराचे पालन करावे व लसीकरण झाल्यानंतर मास्कचा वापर जरूर करावा.
योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- गेल्यावर्षीचा अनुभव पाहता काळजी घ्या
कोरोनाचे संकट अजुनही टळलेले नाही. गेल्यावर्षी सणासुदीच्या दिवसानंतर संक्रमण वाढले हाेते. याचा विचार करता सर्वांनी कोविड नियमाांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकही आहे. सोबतच सर्वांनी लसीकरण करून घ्यावे.
राधाकृष्णन बी. , मनपा आयुक्त