नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल
By admin | Published: May 8, 2016 03:11 AM2016-05-08T03:11:29+5:302016-05-08T03:11:29+5:30
मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सायकलला कट मारला आणि आठ वर्षीय बालक टिप्परच्या चाकाखाली आला.
टिप्परने बालकास चिरडले : संतप्त नागरिकांनी जाळले आठ टिप्परसह एक टँकर
मनसर : मुरुमाची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सायकलला कट मारला आणि आठ वर्षीय बालक टिप्परच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील बोर्डा (सराखा) येथे या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आठ टिप्पर व एक टँकर अशी एकूण नऊ वाहनांची जाळपोळ केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी बोर्डा येथील १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. दुसरीकडे, अपघाताच कारणीभूत ठरलेला टिप्पर जप्त करण्यात आला असून, टिप्परचालकास अटक करण्यात आली.
मनीष पंढरी देवगडे (८, रा. पांढुर्णा) असे मृत बालकाचे नाव आहे. तो बोर्डा येथील मारोतराव धारणे यांच्याकडे लग्नासाठी आला होता. तो किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी जात असताना भरधाव टिप्परने त्याच्या सायकलला कट मारला आणि तो चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिडलेल्या बोर्डावासीयांनी घटनास्थळी एक आणि गावापासून काही अंतरावर पाच, खाणीजवळ तीन अशा आठ टिप्पर व एका टँकरची जाळपोळ केली.
या प्रकरणी रामटेक पोलिसांनी हंसराज वंजारी, रा. कामठी यांच्या तक्रारीवरून नागरिकांविरुद्ध भादंवि ४३७, १४३, १३५ अन्वये गुन्हे दाखल केले असून, कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. या जाळपोळीमध्ये अंदाजे १ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दुसरीकडे, अपघातास कारणीभूत ठरलेला एमएच-४०/एन-६४३५ क्रमांकाचा टिप्पर जप्त करण्यात आला असून, टिप्परचालक दत्तात्रय किशन गुडे (३५, रा. कामठी) यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मनीषच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी पांढुर्णा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनीष हा मोठा असून, त्याला एक भाऊ व दोन बहिणी आहेत.
ओरिएन्टल कंपनीचे कर्मचारी तसेच त्यांच्याकडे किरायाने असलेल्या वाहनांचे चालक परिसरात मनमानी करीत असल्याने नागरिकांत त्यांचविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासन हा असंतोष विचारात घेतला नाही. आ. डी. एम. रेड्डी, माजी आ. आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी शनिवारी दुपारी बोर्डा गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मृत मनीषच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)