सिटिझन फोरमने खड्ड्यांना दिले महापौर, आयुक्तांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:51+5:302021-09-07T04:11:51+5:30
नागपूर : ‘नागपूर तुला महापालिकेवर भरोसा नाय काय’ असे विडंबन गीत गात सिटिझन फोरमने रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांना महापौर, आयुक्तांचे ...
नागपूर : ‘नागपूर तुला महापालिकेवर भरोसा नाय काय’ असे विडंबन गीत गात सिटिझन फोरमने रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांना महापौर, आयुक्तांचे नाव दिले.
सिटिझन फोरमच्या सदस्यांनी मानस चौक, लोहापूल, माऊंट रोड येथे सकाळच्या सुमारास आंदोलन करत महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर कटाक्ष टाकला. मानस चौक व सदर मार्गावरील खड्ड्यांभोवती चुन्याचे रेखांकन करत या खड्ड्यांना हार, फुले वाहून व उदबत्तीने पूजन करण्यात आले. नारळ फोडून या खड्ड्यांचे नामकरण करण्यात आले. मानस चौक येथील खड्ड्याला महापौर दयाशंकर तिवारी यांचे नाव देण्यात आले. लोहापूल परिसरातील खड्ड्यांना स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची नावे देण्यात आली. माऊंटरोड, सदर येथील खड्ड्याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे नाव देण्यात आले. यावेळी ‘नागपूरच्या रस्त्यात झोल झाेल, रस्त्यातले खड्डे खोल खाेल, लोकांचा पैसा माती मोल, नागपूर तुला मनपावर भरोसा नाय काय’ असले विडंबन गीत गात व्यथा व्यक्त करण्यात आली. खड्ड्यांच्या समस्येबाबत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आल्यानंतर प्रशासनाने थातूरमातूर काम करून काही खड्डे बुजवले. रस्त्यावर बारीक चुरीचा सडा पसरल्याने अनेक दुचाकीस्वार सातत्याने घसरून पडत असतात. यावेळी या आंदोलनाचे संयोजक रोहित कुंभारे, प्रतीक बैरागी, अमित बांदूरकर, अभिजित झा, अभिजितसिंह चंदेल, वैभव शिंदे पाटील, प्रज्वल गोड्डे, शिवम उमरेडकर, राजन पडोळे, तेजस पाटील, संकेत महल्ले, संदीप पटले, रूपेश चौधरी, अथर्व काकडे, लिखित राऊत, मिहीर पेलणे, संदेश उके, अमेय पन्नासे, हेमंत शाहू उपस्थित होते.
..............