आनंदनगरातील गार्इंच्या गोठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Published: June 1, 2016 03:11 AM2016-06-01T03:11:07+5:302016-06-01T03:11:07+5:30

रहिवासी भागात असलेल्या गाय आणि म्हशीच्या दोन गोठ्यांमुळे आनंदनगर परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

Citizen's health hazards due to the cattle breed in Anandalagar | आनंदनगरातील गार्इंच्या गोठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आनंदनगरातील गार्इंच्या गोठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

नागपूर : रहिवासी भागात असलेल्या गाय आणि म्हशीच्या दोन गोठ्यांमुळे आनंदनगर परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. माशा, शेणातील किडे आमि डासांमुळे नागरिक हैराण झाले असून, रस्त्यावर आणि खेळण्याच्या मैदानात सर्वत्र शेण पडून असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून आनंदनगर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर तुमसरे यांनी असंख्य तक्रारी प्रशासनाकडे दिल्या. पण प्रशासन एक विभाग ते दुसरा विभाग कागदी हत्ती चालविण्यात व्यस्त असल्याने नागरिकांची समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आता तर नागरिक परिसरातील दुर्गंधी आणि शेणामुळे हैराण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्वरित पावले न उचलल्यास नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आनंदनगरपासून सक्करदरा चौकाकडे जाणारा एकच मार्ग आहे. याच मार्गावर भाजीचे दुकान, रेस्टॉरंटस् आणि बाजारपेठ आहे. त्यामुळे आनंदनगरातील नागरिकांना याच मार्गाने जाणे क्रमप्राप्त आहे. पण या मार्गावर गाय आणि म्हशीचे दोन गोठे आहेत. गोठ्यातील गाई, म्हशी रस्त्यावर उभ्या असतात. जनावरांमुळे रस्त्यावरून वाहतूक करणे अशक्य होते. याशिवाय ठिकठिकाणी शेण पडून असल्याने नागरिकांची वाहने शेणातून घसरतात आणि किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढते आहे. जनावरांना किमान गोठ्यात बांधून ठेवण्याची विनंती अनेकदा नागरिकांनी केली; पण जनावरांचे मालक अरेरावीने वागतात. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण कुठलीही कारवाई गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेली नाही. मनपाचे सहआयुक्त मोरोणे, पदाधिकारी रामटेके, नेहरूनगर झोनचे उपायुक्त यांना चंद्रशेखर तुमसरे यांनी नागरिकांच्यावतीने तक्रारी दिल्या. पण संबंधित विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून प्रत्येक वेळी नागरिकांची बोळवण केली जात असून, यामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचा नारा देणारे प्रशासन तब्बल तीन वर्षांपासून अनेकदा तक्रारी करून नागरिकांच्या समस्या सोडवू शकले नाही. त्यामुळे आनंदनगरातील नागरिकांनी तीव्र संताप लोकमतकडे व्यक्त केला आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करीत असल्याने आता तक्रार नेमकी कुणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गोठा मालकांना विनंती केली असता, ते अरेरावीची भाषा वापरून नागरिकांनाच धमक्या देत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)

मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही
आनंदनगर परिसरात एक मध्यवर्ती खेळण्याचे मैदान आहे. सकाळी आणि सायंकाळी येथे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले खेळण्यासाठी, फिरण्यासाठी जातात. पण या मैदानात फिरण्याच्या ट्रॅकवर सर्वत्र शेण असल्याने फिरणे दुरापास्त झाले आहे. मुलांना या मैदानात खेळताच येत नाही. अनेकदा सकाळी मुले सायकल घेऊन शाळेत जात असताना रस्त्यावर साचलेल्या शेणाच्या ढिगाऱ्याने सायकलवरून घसरून पडतात आणि त्यांचा शाळेचा गणवेश शेणाने भरतो. परिसरात सर्वत्र दुर्गंधी असल्याने यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली असून कुठल्याही नेत्याने या परिसरातील रस्त्यावर केवळ एक मिनिट उभे राहून दाखवावे, असे खुले आव्हान नागरिकांनी दिले आहे. सक्करदरा पोलिस स्टेशनच्या भिंतीलगतच ही जनावरे उभी राहतात, तेथेही घाण करतात पण पोलीस प्रशासनही गप्प आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन तरीही कारवाई नाही
यासंदर्भात संतप्त नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले पण अद्याप कारवाई झालीच नाही. महापौरांनी स्वत: या परिसरात येऊन पाहणी करावी आणि या रस्त्यावर थोडा वेळ घालवून दाखवावा, असे आव्हान देत या प्रकरणी नागरिकांची मागणी लक्षात घेत त्वरित या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी चंद्रशेखर तुमसरे आणि नागरिकांनी केली आहे.

Web Title: Citizen's health hazards due to the cattle breed in Anandalagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.