भांडेवाडीत सुरू होणाऱ्या कत्तलखान्यामुळे नागरिक दहशतीत
By admin | Published: June 13, 2016 03:20 AM2016-06-13T03:20:15+5:302016-06-13T03:20:15+5:30
कामठीतील कत्तलखाना भांडेवाडीत स्थानांतरित करण्याचे नगर विकास विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे.
नागरिकांच्या संतप्त भावना : प्रशासनाशी एल्गार करण्याची भूमिका
नागपूर : कामठीतील कत्तलखाना भांडेवाडीत स्थानांतरित करण्याचे नगर विकास विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. विभागातर्फे जिल्हाधिकारी व नगरपरिषद कामठीचे मुख्याधिकारी यांना कत्तलखान्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवावा, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. हे पत्र भांडेवाडी परिसरातील नागरिकांच्या हाती लागल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. २००३ मध्ये भांडेवाडीतील कत्तलखाना बंद करण्यासाठी येथील नागरिकांनी यातना भोगल्या आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा तीच वेळ आल्याने नागरिक दहशतीत आहे. प्रशासनाचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी संघर्ष पुन्हा पेटतो आहे.
भांडेवाडीचा डम्पिंग यार्ड येथील लोकांच्या जीवावर उठला आहे. त्यातच शहरातील मेडिकलचे संपूर्ण वेस्ट येथेच येऊन नष्ट करतात. त्याचाही परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. भांडेवाडीला लागून असलेल्या चांदमारी, बिडगाव, साईबाबानगर, गणेश ले-आऊट, अंतुजीनगर, पवनशक्तीनगर येथे डम्पिंगमुळे दम्याचे, किडनीचे, हृदयाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्यातच आता कत्तलखाना येथील नागरिकांच्या समस्येत भर घालणार आहे.
यापूर्वी येथे कत्तलखाना होता. या कत्तलखान्याचा त्रास बिडगाव, तरोडी, दिघोरी, खरबी, पांडुर्णा येथील गावाला व्हायचा. कत्तलखान्यातील घाण नाल्यात सोडण्यात येत होती. त्यामुळे गावातील पाण्याचे स्रोत खराब झाले होते. परिसरातील शेती खराब झाली होती. कटलेल्या जनावरांचे मांस वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडून रहायचे. कुत्र्यांचा प्रचंड आतंक असायचा. कत्तलखान्याच्या दुर्गंधीमुळे घरात राहणे कठीण व्हायचे. आरोग्याच्या समस्या उद्भवल्या होत्या. त्यावेळी कत्तलखान्यासाठी मोठा संघर्ष झाला. १४७ लोकांवर गुन्हे दाखल झाले. लोकांना २० दिवस कारागृहात रहावे लागले. १२ वर्षे न्यायालयाचे हेलपाटे मारावेलागले. प्रशासनाच्या भूमिकेमुळे परत तीच वेळ येथील लोकांवर येणार आहे. त्यामुळे काही लोकांमध्ये भीती आहे, काहींनी प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका घेतली आहे.(प्रतिनिधी)